महाविकास आघाडीकडून पृथ्वीराज बाबा हॅटट्रिक साधण्यासाठी पुन्हा रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात महायुतीने भाजपचे खंदे कार्यकर्ते आणि नेते डॉ. अतुल भोसले यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादीतले बंडखोर आणि वंचितचे संजयगाडे यामुळे कराड दक्षिणची निवडणूक पृथ्विराज बाबांसाठी सोपी ठरणार नाही.
कराड दक्षिणविधानसभा मतदारसंघ इतिहास
भारतीय निवडणुकांच्या इतिहासात पहिल्या दोन निवडणुकांचा अपवाद वगळता दक्षिण कराडमधून सातत्याने काँग्रेसचा उमेदवार निवडून येत आहे. पहिल्या दोन निवडणुकांमध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून यशवंतराव मोहिते यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर यशवंतराव मोहिते हे काँग्रेस पक्षात आले. 1962 ते 1978 पर्यंतच्या चार निवडणुकीत यशवंतराव मोहिते यांनी काँग्रेसच्या तिकीटावर विजय मिळवला. त्यानंतर 1980 पासून 2009 पर्यंत लागोपाठ सात निवडणुकांमध्ये विलासराव पाटील उंडाळकर दक्षिण कराडचे आमदार म्हणून निवडून आले. 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिणमध्ये उमेदवारी दिली गेली. तेव्हापासून सलग दोनवेळा पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणचे प्रतिनिधित्व करत आहेत. पण तेव्हापासून पृथ्वीराज चव्हाणांना उंडाळकरांच्या गटाशीही दोन हात करावे लागत आहेत.
advertisement
2014 मध्ये विलासराव पाटील उंडाळकर राष्ट्रवादीकडून लढले पण पृथ्वीराज बाबांनी त्यांचा पराभव केला. तेव्हा विधानसभा निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच कराडमध्ये लक्षणीय मतं मिळवली होती. त्या वेळी अतुल भोसले रिंगणात होते. 2019 मध्ये विलासरावांचे पुत्र उदयसिंह विलासराव पाटील उंडाळकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. भाजपानेही डॉ. अतुल भोसले यांना उमेदवारी देऊन त्यांच्यापाठी ताकद उभी केली. तरीही 9050 च्या मताधिक्याने पृथ्वीराज चव्हाण यांनी विजय मिळवला. पृथ्वीराज बाबांचं मताधिक्य जवळपास निम्म्याने कमी झालं होतं.