विधानसभेच्या 288 जागांपैकी 29 जागांवर विरोधी आघाडीचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले. 29 जागांपैकी शिवसेना ठाकरे गटाचे 17 उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर आणि एक चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. ही विधानसभा निवडणूक अतिशय निकाराने लढली जाईल, असा होरा होता. मात्र, निकाल एकतर्फीच राहिला. महायुतीने 234 जागांवर विजय मिळवला.
महायुतीसाठी भाजप 132 जागांसह आघाडीवर आहे, त्यानंतर शिवसेना (57) आणि राष्ट्रवादी (41) यांनी सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट 20, काँग्रेस 16, आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने 10 जागा जिंकल्या. ठाकरे यांच्या पक्षाने महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी त्यांचे 18 उमेदवार दुसरे स्थान मिळवू शकले नाहीत.
advertisement
एक उमेदवार चौथ्या स्थानी....
महाविकास आघाडीचे उमेदवार पराभूत झालेल्या 29 जागांवर महायुतीला टक्कर देऊ शकले नाहीत. शिवसेना ठाकरे गटाने महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. मात्र, ठाकरेंचे 18 उमेदवार हे दुसरं स्थानही मिळवू शकले नाहीत. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील उमेदवार गणेश धात्रक चौथ्या क्रमांकावर राहिला. या जागेवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सुहास कांदे विजयी झाले. रोहन बोरसे हा अपक्षही धात्रकच्या पुढे होता, तो तिसऱ्या क्रमांकावर होता.
अधिक जागांवर दावा, उमेदवार चुकले?
महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात स्पर्धा लागली होती. शिवसेना ठाकरे गटाने अधिकाधिक जागांवर दावा केला होता. त्याशिवाय, काही ठिकाणी ठाकरे गटाकडून उमेदवारही चुकीचे निवडले गेले असल्याची चर्चा सुरू झाली. ठाकरेंनी काही ठिकाणी चांगले उमेदवार दिले असते तर त्या जागांवर विजय मिळवता आला नाही. त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला.
