लोकसभा निवडणुकीत भाजपला विदर्भातील मतदाराकडून मोठ्या अपेक्षा असताना भाजपला, महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. त्या तुलनेत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला आपला गड पुन्हा मिळविण्यात बऱ्यापैकी यश आले. त्यामुळे ढासळलेला गड विधानसभा निवडणुकीत परत मिळविण्यासाठी भाजपने कंबर कसली. विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडीने मतदारांच्या भावनाना हात घालून मन जिंकण्याचा प्रयत्न केला. यामध्ये भाजपकडून 'एक है तो सेफ है', 'कटंगे तो बटेंगे' सारख्या घोषणा भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी दिल्या. मात्र, दुसरीकडे प्रत्यक्षात मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या 'लाडक्या बहिणीचा देवा भाऊ' ही टॅग लाईन जनतेच्या पसंतीस पडली. शेतीचे झालेले प्रचंड नुकसान प्रामुख्याने सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी याचा सत्ताधारी यांच्यावर असलेला रोष पाहून सोयाबीन उत्पादक, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना MSP शिवाय बोनस देण्याची घोषणा करण्यात आली. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोलामध्ये हिंदुत्व हा मुद्दा प्रभावी राहिला.
advertisement
धार्मिक मुद्यांना काउंटर करण्यासाठी महाविकास आघाडीने शेतकऱ्यांचे प्रश्न प्रचारात ऐरणीवर आणले. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्याची घाई न करण्याचा सल्ला देत 7 हजार रुपये भाव देण्याची घोषणा महाविकास आघाडीने केली. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस सहित 3300 रुपये देण्याची घोषणा राहुल गांधींनी केली. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना MSP वर खरेदीचे आश्वासन देण्यात आले. विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचे रणशिंग संविधान सन्मान संमेलनाने फुंकले. संविधानावरील हल्ल्याचा मुद्दा महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीत चर्चेत ठेवण्यात आला. तर, प्रचाराच्या शेवटच्या रविवारी, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांचा रोड शो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालय परिसरात आल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेले झेंडे, राडा यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले.
