जवळपास अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडली. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील 40 आमदारांनी ठाकरेंविरोधात बंड केले. तर, दुसरीकडे या गटाने पक्षावरच दावा ठोकला. निवडणूक आयोगाने आमदारांच्या संख्येच्या आधारे शिवसेना पक्षावर एकनाथ शिंदे यांचा दावा मान्य केला. तर, दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेचे प्रकरण अद्यापही पूर्णपणे संपले नाही.
advertisement
राजकीयदृष्ट्या उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. या निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाने या निवडणुकीतील यशासाठी कंबर कसली आहे.
उद्धव ठाकरे यांची भावनिक साद...
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून शिवसैनिक आणि मतदारांना आवाहन केले आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, न्याय मागण्यासाठी तुमच्याकडे आलो आहे. लोकशाहीसाठी न्याय मागण्यासाठी आलोय. अडीच वर्षापूर्वी आपलं सरकार कसं पाडण्यात आलं. हे आपण पाहतोय... ते अजूनही आपण भोगतोय.
त्यांनी आपला पक्ष चोरला...दिवसाढवळ्या पक्ष चोरला...दरोडाच टाकला... पक्षाचे नाव चोरले, चिन्ह चोरले...शिवसेनाप्रमुखांचा फोटो चोरला. एवढं चोरूनही आपल्या आशिर्वादाने मी अजूनही ठाम उभा आहे. त्यांना वाटतं की त्यांनी माझ्याकडील सगळंच चोरलं...त्यांना एकच गोष्ट चोरता आली नाही. ते म्हणजे तुमचं प्रेम, आशिर्वाद आणि तुमचा विश्वास. मी एकाच गोष्टीवर मी आज लोकशाहीसाठी या बेबंदशाहीच्या विरोधात उतरलो आहे.
मला काही हवंय म्हणून नाही तर देशाच्या लोकशाहीसाठी लढतोय. या लढाईत माझ्या अस्तित्वाचा प्रश्न नाही तर महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्राला लुटण्याचे प्रयत्न सुरू आहे, गुलाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपल्या डोळ्यादेखत होऊ द्यायचे आहे का? मला तरी पटत नाही. सगळ्यांनी उतरा...कुटुंबासह मतदानाला उतरा...जिथे उमेदवार आहेत, त्यांना विजयी करा अशी भावनिक साद उद्धव यांनी घातली.
