लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीच्या विधानसभा निवडणुकीत धक्का बसू नये, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. अजित पवार यांनी कधी नव्हे ते पहिल्यांदाच बारामतीत तळ ठोकून प्रचार केला असल्याचे दिसून आले.
बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना मताधिक्य का मिळाले?
बारामती विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार यांच्याविरोधात 48 हजार मतांची आघाडी मिळाली होती. अजित पवारांनी याबाबत बोलताना मतदारांची आपल्यावर नाराजी नसल्याचे सांगितले. सुप्रिया सुळे यांना एका विशेष कारणाने मताधिक्य मिळाले असल्याचा दावा अजित पवारांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत केला.
advertisement
अजित पवारांनी काय म्हटले?
अजित पवारांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदारांनी शरद पवार साहेबांच्या वयाचा विचार करून सुप्रियाला मते दिली. सुप्रियाचा पराभव झाला असता तर पवार साहेबांच्या मनाला लागलं असतं. वाईट वाटलं असतं, असा विचार करून मतदान झाले असल्याचे अजित पवारांनी म्हटले.
लोकसभेनंतर अजितदादा सतर्क…
अजित पवारांनी म्हटले की, लोकसभा निवडणुकीत आमचा उमेदवार बारामती विधानसभा मतदारसंघातून 48 हजार मतांनी पिछाडीवर होता. त्यामुळे ही मला आधी ही 48 हजारांची पिछाडी भरुन काढावी लागणार आहे. त्यानंतर मिळणारी मते हे मताधिक्य असणार असल्याचे अजित पवारांनी म्हटले.
अजित पवार यांनी यावेळी बारामतीत ठाण मांडले असल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत त्यांच्यासमोर त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचे आव्हान आहे. बारामतीमध्ये अजित पवारांनी गावभेट दौराही आयोजित करून काही गावांना भेटी दिल्यात.
