कर्जत-जामखेडमधील प्रतिष्ठेच्या निवडणुकीत रोहित पवार यांना 1 लाख 27 हजार 676 मते मिळाली. तर, राम शिंदे यांना 1 लाख 26 हजार 433 मते मिळाली. या अटतटीच्या लढाईत रोहित पवार यांचा 1243 मतांनी विजय झाला. रोहित पवार यांना या विजयात त्यांचे काका आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदत केली असल्याची चर्चा आहे. या चर्चा स्थानिक पातळीवर सुरू असताना दुसरीकडे आता साताऱ्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे.
advertisement
साताऱ्यातील व्हिडीओत काय?
राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये प्रीती संगमावर अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार, आमदार रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित झाले.
त्याच दरम्यान, अजित पवार आणि रोहित पवार हे आमने सामने आले. यावेळी रोहित पवारांनी अजित पवारांची भेट घेतली. बच गया, दर्शन घे… दर्शन, काकाचं. वाचलास, नाहीतर माझी सभा झाली असती तर काय झालं असतं? अशी टिप्पणी केली.
अजित पवारांची सभा नाही...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत जामखेडमध्ये भाजप उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली नाही. अजित पवार यांची सभा झाली असती तर मतांमध्ये फरक पडला असता असेही म्हटले जात आहे. मात्र, काही कारणांनी अजित पवारांनी रोहित पवारांविरोधात सभा घेणे टाळले.
