एका वृत्तवाहिनीशी बोलताना, उदय सामंत यांनी सांगितले की, कोकण हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा बालेकिल्ला आहे. त्यांच्या विचारांवर आम्ही काम करतोय. फक्त गद्दार...गद्दार बोलून होत नाही, कामही करावं लागत असल्याचा टोलाही सामंत यांनी ठाकरे गटाला लगावला. ठाकरे गटाचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचे सामंत यांनी म्हटले. शिवसेना कोणाची मतदारांनी सांगितले असून आम्हाला महाराष्ट्रात यश मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
ठाकरेंचे आमदार संपर्कात, आता...
उदय सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट करताना म्हटले की, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. काल निकाल लागल्यानंतर रात्रीपासूनच काही आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. ठाकरेंकडे सध्या 20 आमदार आहेत. त्यातील 2-3 आमदार सोडून बाकी सगळे आमदार आमच्याकडे येतील असा दावा सामंत यांनी केला.
ठाकरेंचे कोणते आमदार शिंदेंकडे येणार?
उदय सामंत यांनी सांगितले की, महायुतीला मोठं यश मिळाले. पाच वर्षांचा कालावधी हा खूप मोठा कालावधी असतो. त्यामुळे ठाकरे गटाकडे असलेले आमदार यांच्याकडे येतील. या आमदारांना कधी आणि कसा पक्ष प्रवेश द्यायचा याचा निर्णय एकनाथ शिंदे घेणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. तूर्तास आमदारांची नावे जाहीर करणार नसून वेळ आल्यावर आमदारांची नावे समोर येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला सल्ले देणाऱ्यांनी आता बडबड बंद करावी, अन्यथा उरलेले आमदारही आमच्याकडे येतील असा टोलाही सामंत यांनी ठाकरे गटाला लगावला.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील असल्याचा निर्वाळा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना यांच्यात लोकसभा निवडणुकीत चांगलीच लढत झाली. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी आपली जादू दाखवत 57 जागा निवडून आणल्या. तर, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 20 जागांवर समाधान मानावे लागले. उद्धव यांचे बहुतांशी आमदार मुंबईतून निवडून आले. तर, शिंदे यांचे आमदार मुंबई महानगर क्षेत्र, मराठवाडा आणि इतर भागातून निवडून आले.
