केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीका करताना व्यापारी आणि दुकानदार वर्गाबाबत बदनामीकारक वक्तव्य केले आहे. राऊतांच्या वक्तव्याचा फटका शिवसेना ठाकरे गटासह महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे. व्यापारी आपल्या फायद्यासाठी खोटं बोलतो. दुकानदार आपल्या फायद्यासाठी भेसळ करतो असे वक्तव्य संजय राऊतांनी केले.
advertisement
संजय राऊत यांनी काय म्हटले होते?
अमित शाह खोटं बोलत आहेत. व्यापारी नेहमी खोटं बोलतो, दुकानदार हा आपल्या फायद्यासाठी खोटं बोलतो अथवा भेसळ करतो. ग्राहकाला फसवतो. कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला शिवसेनेने कधीही विरोध केला नाही. अमित शहा हे खोटं बोलत असल्याचे राऊत यांनी सांगितले.
राऊत यांनी पुढे म्हटले की, कलम 370 हटवण्यात स्वतःची पाठ थोपटून घेऊ शकतात. ‘मैंने हटाया मैंने हटाया’ असे म्हणता, मग स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यायला तुम्हाला कोणी अडवलं आहे असा सवाल ही त्यांनी केला. आजही कश्मीर मध्ये आपल्या जवानांच्या हत्या सुरू असल्याचे सांगत कलम 370 हटवून कश्मीरमध्ये आपण काय दिवे लावले आहेत, असा बोचरा वारही राऊतांनी केला.
भाजपची जळजळीत टीका...
भाजपचे प्रवक्ते प्रविण दरेकर यांनी संजय राऊतांवर जळजळीत टीका केली. संजय राऊतांनी शिवसेनेचे व्यापारीकरण केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळची शिवसेना आणि आताची शिवसेना यात फरक आहे. व्यापारी आणि दुकानदार या देशाचे नागरीक आहेत. संजय राऊतांच्या वक्तव्याने संपूर्ण व्यापारी-दुकानदार वर्गाचा अपमान झाला आहे. दुकानदारांनी आता पुड्या बांधता-बांधता राऊतांचा समाचार घ्यावा आणि महायुतीच्या बाजूने उतरावे असे आवाहन त्यांनी केले.
