मुख्यमंत्रीपदाबाबत राज्यात अनेक चर्चा सुरू आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांनाच पु्न्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून संधी दिली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे भाजपच्या अनेक आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आपला जोर लावला आहे. राज्यात हा सगळा गोंधळ सुरू असताना दुसरीकडे बुधवारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानकपणे तातडीची पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले असताना अजित पवारांनी आपले दोन विश्वासू सहकारी अमित शाह यांच्या भेटीसाठी पाठवले. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिल्लीत शाह यांची भेट घेतली.
advertisement
शाह यांच्यासोबतच्या भेटीत काय झाले?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी भेटीच्या वेळी भाजपला आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करून सांगितली. भाजपचे संख्याबळ जास्त असल्यामुळे भाजपला मुख्यमंत्री पद घेण्याचा हक्क असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना सांगितले. मुख्यमंत्रीपदाबाबतचा भाजपचा निर्णय आम्हाला मान्य असणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आज ठरणार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा
महायुतीला प्रचंड बहुमत मिळून देखील राज्याचा मुख्यमंत्री कोण, याचा सस्पेन्स कायम आहे. निवडणुकीत महायुतीच्या पारड्यात 234 जागा आल्या. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत तिढा सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे आज राजधानी दिल्लीत होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दिल्लीत आज काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत आज बैठक होणार आहे. या बैठकीनंतर राज्यातील मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय होणार आहे.
