नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यांनी म्हटले की, देवेंद्रजी मुख्यमंत्री होत असतील तर ही विदर्भाच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. विदर्भाचा बॅकलॉग गेल्या 7-8 वर्षात पूर्ण झाला नाही. आता त्यांच्याकडून पूर्ण अपेक्षा आहेत. आता त्यांना काम करण्यासाठी फ्री हॅन्ड असून कोणीही थांबवू शकत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत असताना विदर्भाचा लेकरू म्हणून विदर्भाचा बॅकलॉग, बेरोजगारी, शेतकरी प्रश्नांकडे अधिक लक्ष द्यावे, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.
advertisement
आता बदला घेणार नाही....
देवेंद्र फडणवीस हे आता विदर्भाला न्याय देतील अशी अपेक्षा बाळगूया असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस हे बदला घेणारे राजकारण करतात. आता, त्यांच्याकडून या गोष्टी होणार नसल्याचे अपेक्षा ठेवायला हरकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. राजकारणात वैचारिक लढाई असावी, वैयक्तिक कोणी कोणाचेही वैरी नाही. त्यामुळे त्यांच्या संदर्भात महाराष्ट्रात जी काही भूमिका जनतेमध्ये होती ती पुसून निघेल
आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ते छाप पडतील अशी अपेक्षा आहे, असे त्यांनी म्हटले.
शिंदे-पवारांची महायुतीमधील उपयुक्ता संपली...
विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर निशाला साधला. त्यांनी म्हटले की, अडीच वर्षे मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीला, नेत्याला सत्ता मिळूनही सत्तेतील सर्वोच्च पद मिळत नाही. त्यावेळी चेहरा पडलेला दिसतो, असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदेना लगावला. 2029 मध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची उपयुक्तता पूर्ण संपलेली असेल असेही त्यांनी सांगितले. त्यांना सत्तेत पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या आशिर्वादाने राहता येईल, अन्यथा ते काहीही करू शकणार नाही ते विरोध ही करणार नाही असेही त्यांनी म्हटले.
