महायुती सरकारचा नवा मुख्यमंत्री कोण असणार, यावर आता दिल्लीतील बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे. आज दिल्लीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत आज बैठक होणार आहे. या बैठकीच्या आधी अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात राज्याच्या राजकारणावरून बैठक झाली.
advertisement
शाह-तावडे यांच्या बैठकीत काय झालं?
अमित शाह आणि विनोद तावडे यांच्या बैठकीत महायुती सरकारचा विषय प्रामुख्याने असल्याची माहिती सूत्रांनी दिली. “महाराष्ट्र, मुख्यमंत्री आणि मराठा” या समीकरणावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. अमित शाह यांनी या बैठकीत विनोद तावडे यांच्याकडून महाराष्ट्राच्या मराठा समाजाची समीकरणं समजून घेतली. देवेंद्र फडणवीस यांची राज्यात पुन्हा मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्यास मराठा मते कशी टिकवता येतील, यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाराष्ट्रात बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास मराठा समाजाच्या मतांवर किती परिणाम होऊ शकतो याची बेरीज-वजाबाकी या बैठकीत करण्यात आली. मराठा चेहऱ्याऐवजी दुसरा चेहरा दिला तर मराठा मतं दुखावण्याची चिंता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला सतावत आहे. त्यामुळेच मराठा समाज आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा याबाबत केंद्रीय मंत्री अमित शहांनी आढावा घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भाजपची महाराष्ट्रात सत्ता आल्यापासून म्हणजेच 2014 ते 2024 पर्यंत मराठा समाजाची आंदोलन, कोर्टाचे निकाल, मराठा नेत्यांची भूमिकेचा आढावा शाह यांनी तावडे यांच्यासोबतच्या बैठकीतून घेतला. भवितव्याच्या दृष्टीनं मराठा चेहरा किती महत्वाचा आहे याबाबत सर्व गणितांची मांडणी करण्यात आली. आगामी निवडणुका, फडणवीसांचा चेहरा आणि मराठा, ओबीसीचा मतांबाबत चर्चा या बैठकीत चर्चा झाली.
मुख्यमंत्रीपदाबाबत आज होणार निर्णय?
राज्याच्या नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस मतदान झाले. महायुतीच्या पारड्यात 234 जागा आल्या. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत तिढा सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे आज राजधानी दिल्लीत होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दिल्लीत आज काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत आज बैठक होणार आहे. या बैठकीनंतर राज्यातील मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय होणार आहे.
