आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेवरून महायुतीत वादाचे धुमारे फुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ठाणे महापालिकेसाठी भाजपचे मिशन घेऊन मैदानात उतरलेले वन मंत्री गणेश नाईक यांची नवी मुंबईत कोंडी करण्यात आल्याचे संकेत दिसू लागले आहेत.नवी मुंबईतील महापालिका निवडणुकांसाठी शुक्रवारी (25 ऑगस्ट) उशीरा जाहीर झालेल्या प्रभाग रचनेवरून नव्या राजकीय संघर्षाचे बीज रोवत असल्याचे संकेत मिळत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मंत्री गणेश नाईक यांच्यातील संघर्ष आता आणखीच तीव्र होण्याची शक्यता आहे.
advertisement
महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिदे यांनी 111 सदस्यसंख्येच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर केला. चार सदस्यांचे 27 आणि तीन सदस्यांचा एक, अशा 28 प्रभागांचा हा आराखडा लगेचच वादाच्या भोवऱ्यात सापडला. भाजपच्या कार्यकर्त्यांसह नाईक यांच्या गटात या रचनेविरोधात तीव्र असंतोष दिसून आला. "या आखणीत ठाण्याचा प्रभाव आहे," असा थेट आरोप नाईक समर्थकांकडून करण्यात आला. गणेश नाईक यांची नवी मुंबईच्या राजकारणावर पकड आहे. आता त्यालाच धक्का लागण्याची शक्यता आहे.
शनिवारी नाईक यांच्या वाशी येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीत समर्थक व माजी नगरसेवकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. “प्रभाग रचना शिंदे गटाच्या नगरसेवकांना पोषक ठेवून आखली आहे. प्रभावी नगरसेवकांचे बालेकिल्ले तोडण्याचा प्रयत्न झाला आहे,” अशा तक्रारी बैठकीत मांडण्यात आल्या. या बैठकीत नाईक यांनी आपल्या समर्थकांना हा सगळा डाव मला पूर्णपणे माहित असून तुम्ही निश्चित रहा. मी निकराची लढाई लढणार असल्याचे म्हटले.
नाईक समर्थक आणि भाजपच्या काही प्रभावी नगरसेवकांचे 'बालेकिल्ले' तोडण्यासाठी करण्यात आलेल्या कसरती आणि शिंदे गटाच्या उमेदवारासाठी फायदेशीर ठरणारी प्रभाग रचना करण्यात आले असल्याची चर्चा आहे. या प्रभाग रचनेच्या वादावर गणेश नाईक हे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. प्रभाग रचना ही नगरविकास खात्याकडून करण्यात आली. या खात्याची धुरा एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.
गणेश नाईक हे भाजपात असले तरी त्यांचा आणि आमदार मंदा म्हात्रे यांच्याशी सुप्त संघर्ष सुरू आहे. नवी मुंबई भाजप अध्यक्ष निवडीत मंदा म्हात्रे यांच्या निकटवर्तीयाची निवड झाली. तर, गणेश नाईकांच्या समर्थकाला डावलण्यात आल्याचे म्हटले जाते. आता प्रभाग रचनेवरून गणेश नाईकांची डोकेदुखी आणखीच वाढणार आहे.