मुंबई: मागील काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदांसह नगरपालिका, महापालिकांच्या निवडणुका पार पडणार आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांबाबत आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्यामुळे राज्यात आता निवडणूक प्रचाराचा धुरळा उडणार आहे.
राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत मुदत वाढ देण्याची मागणी केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारीपर्यंत राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडण्याचे निर्देश दिले. त्यानंतर राज्यात निवडणुकीच्या कामाला वेग आला आहे.
advertisement
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम वेगाने आकार घेत आहे. 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्या यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी व मतदान केंद्रांची अंतिम यादी 27 ऑक्टोबरपर्यंत प्रसिद्ध करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. भंडारा, गोंदिया, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे चार जिल्हे वगळण्यात आले आहेत.
प्रभाग रचना पूर्ण, मतदार यादीचे काम सुरू
ग्रामविकास विभागाने नुकतीच जिल्हा परिषदेच्या गटांची आणि पंचायत समित्यांच्या गणांची प्रभाग रचना पूर्ण केली आहे. आता आयोगाने जिल्हा प्रशासनाला मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम पाठवला आहे. 1 जुलै 2025 च्या विधानसभा मतदार यादीवर आधारित विभागणी करून गट व गणनिहाय यादी तयार केली जाणार आहे.
निवडणुका कधी होणार?
समोर आलेल्या माहितीनुसार, 8 ऑक्टोबरपर्यंत प्रारूप मतदार यादी तयार होणार आहे. त्यानंतर या 8 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. त्यानंतर मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. मतदार यादी जाहीर झाल्यानंतर काही दिवसातच निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात येईल. त्यामुळे राज्यात डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जानेवारी महिन्यात राज्यात महापालिका निवडणुका धुरळा उडणार असल्याचे म्हटले जात आहे.