राज्यातील रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायतींच्या निवडणुका २७ टक्के इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणासह आणि नव्या प्रभाग रचनेनुसारच होतील, हे न्यायालयाच्या निर्देशानंतर आता स्पष्ट झाले आहे. डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आटपून जानेवारी महिन्यात महापालिका निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आरक्षण सोडतीचा कार्यक्रम कसा असेल?
advertisement
जिल्ह्यांचे संबंधित जिल्हाधिकारी १० ऑक्टोबर २०२५ रोजी वृत्तपत्रांत आरक्षण सोडतीसंदर्भातील सूचना प्रसिद्ध करतील. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. त्यावर १४ ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हरकती आणि सूचना दाखल करता येतील. प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून ३ नोव्हेंबर २०२५ रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाईल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला जाणार नाही
दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने होतील. कोणती निवडणूक आधी, कोणती नंतर हे अद्याप निश्चित झालेले नसले तरी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आधी घेतली जाईल, असे बोलले जाते. या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला जाणार नसल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.