Pune News : ‘तिचा जोगवा' तृतीयपंथी समाज पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी आला धावून, पुण्यातील स्तुत्य उपक्रम
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
नेहमी समाजात उपेक्षित समजल्या जाणाऱ्या तृतीयपंथी समाजाने यावेळी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. 'तिचा जोगवा' या माध्यमातून पूरग्रस्त भागात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून समाजातील आपलं दायित्व पार पाडण्याचा त्यांनी संकल्प केला आहे.
पुणे : नेहमी समाजात उपेक्षित समजल्या जाणाऱ्या तृतीयपंथी समाजाने यावेळी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. आजवर समाजाने त्यांना नेहमी फक्त मागणारे हात म्हणूनच पाहिलं. परंतु यावेळी त्यांनी मदतीचा हात पुढे करून पूरग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. 'तिचा जोगवा' या माध्यमातून पूरग्रस्त भागात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून समाजातील आपलं दायित्व पार पाडण्याचा त्यांनी संकल्प केला आहे.
सावली सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मागील 15 वर्षांपासून समाजसेवा करत असलेल्या तृतीयपंथी डॉ. आम्रपाली मोहिते यांनी सांगितले की, आम्ही समाजाचा एक भाग आहोत. त्यामुळे समाजासाठी काहीतरी करण्याची जबाबदारी आमच्यावरही आहे. समाजाने नेहमी आम्हाला मागणारे हात म्हणूनच पाहिलं, पण या वेळेस आम्ही देणारे हात बनलो आहोत.
advertisement
सोलापूर आणि मराठवाडा परिसरातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान आणि जीवितहानी सोसावी लागली आहे. अनेकांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले असून अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. या परिस्थितीत तृतीयपंथी समाजाने 'तिचा जोगवा' गोळा करून त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. जोगवा आईच्या नावाने मागितला जातो आणि त्याच्याद्वारे गोळा झालेलं साहित्य थेट पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांपर्यंत पोहोचवले जाणार आहे.
advertisement
या मदत सामग्रीमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. आतापर्यंत 20 किलो पोती तांदूळ, 100 ब्लँकेट्स, 150 सॅनिटरी पॅड्स, 500 वह्या व इतर शालेय साहित्य, 3 डबे तेल, साखर, शेंगदाणे यांसह अनेक साहित्य गोळा करण्यात आले असून, एक ट्रॅक्टरभर साहित्य सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात पोहोचवण्यात येणार आहे.
डॉ. आम्रपाली मोहिते यांनी सांगितले की, जोगवा हा फक्त तृतीयपंथींच्या उपजीविकेचा भाग नसून त्याला धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संदर्भ आहे. आम्ही तोच जोगवा आता मदतीसाठी वापरला आहे. समाजातील प्रत्येक घटकाने या आपत्तीच्या काळात पुढे येऊन मदत केली पाहिजे. माणूस म्हणून आपल्या बांधवांसाठी मदतीचा हात पुढे करणे हे आपलं नैतिक कर्तव्य आहे.
advertisement
पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. आयुष्यभर मेहनत करून त्यांनी उभं केलेलं पीक पाण्याखाली जाऊन वाया गेलं. काहींची घरं उद्ध्वस्त झाली. अशा वेळी तृतीयपंथी समाजाने घेतलेला पुढाकार ही खरी सामाजिक एकजूट आहे. या उपक्रमातून समाजात सकारात्मक संदेश गेला आहे की, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटक, कुठल्याही लेबलखाली असो, तो समाजासाठी काहीतरी करू शकतो.
advertisement
तृतीयपंथी समाजाबद्दलचा दृष्टिकोन समाजात बदलण्यासाठी अशा कृतींचं मोठं महत्त्व आहे. आतापर्यंत त्यांना फक्त मागणारे म्हणूनच बघितलं गेलं, पण या वेळेस त्यांनी दिलं आहे. तेही निस्वार्थपणे आणि मनापासून. आम्हीही समाजाचा भाग आहोत आणि आमचंही समाजासाठी योगदान असू शकतं हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे.
पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना मदतीचा दिलासा देणाऱ्या या 'तिचा जोगवा' उपक्रमामुळे तृतीयपंथी समाजाबद्दल समाजात नवा आदर्श निर्माण केला जात आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 01, 2025 9:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune News : ‘तिचा जोगवा' तृतीयपंथी समाज पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी आला धावून, पुण्यातील स्तुत्य उपक्रम