'मी काहीही चूक केली नाही, टीम इंडियाला ट्रॉफी हवी असेल, तर...', 72 तासानंतर नक्वीची पहिली रिएक्शन
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कपच्या ट्रॉफीवरून झालेल्या वादावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तसंच आशियाई क्रिकेट परिषदेचा (एसीसी) प्रमुख मोहसिन नक्वी याने मौन सोडलं आहे.
दुबई : आशिया कपच्या ट्रॉफीवरून झालेल्या वादावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तसंच आशियाई क्रिकेट परिषदेचा (एसीसी) प्रमुख मोहसिन नक्वी याने मौन सोडलं आहे. आशिया कप ट्रॉफीच्या वादाला 72 तास झाल्यानंतर नक्वीने या संपूर्ण घटनाक्रमावर प्रतिक्रिया दिली आहे. रविवारी भारताने आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव केला, तेव्हाही आपण त्यांना ट्रॉफी द्यायला तयार होतो आणि आताही तयार आहोत. सूर्यकुमार यादव आणि त्याच्या टीमने एसीसीच्या ऑफिसमध्ये यावं आणि माझ्याकडून ट्रॉफी न्यावी, त्यांचं स्वागत आहे, असं नक्वी म्हणाला आहे.
पीसीबीचा अध्यक्ष तसंच पाकिस्तानच्या गृह खात्याचा प्रमुख असलेल्या नक्वीने आपण बीसीसीआयची माफी मागितल्याच्या वृत्ताचंही खंडन केलं आहे. आपण काहीही चूक केलेली नाही, त्यामुळे माफी मागणार नाही, असं नक्वी म्हणाला आहे.
'एसीसी अध्यक्ष म्हणून, मी त्याच दिवशी ट्रॉफी सोपवण्यास तयार होतो आणि मी अजूनही तयार आहे. जर त्यांना खरोखरच ट्रॉफी हवी असेल, तर त्यांनी एसीसी कार्यालयात येऊन माझ्याकडून घेऊन जावी. मी काहीही चुकीचे केलेले नाही. मी कधीही बीसीसीआयची माफी मागितली नाही आणि कधीही मागणार नाही,' अशी पोस्ट नक्वीने केली आहे.
advertisement
भारतीय टीमने नक्वीकडून ट्रॉफी घ्यायला नकार दिल्यानंतर नक्वी आशिया कपची ट्रॉफी घेऊन दुबईच्या स्टेडियममधून बाहेर पडले. नक्वी याने ऑपरेशन सिंदूरवेळी आणि त्याआधीही भारताविरोधी भूमिका घेतली, त्यामुळे टीम इंडियाने नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारायला नकार दिला. पण तरीही नक्वी आशिया कपच्या फायनलनंतर झालेल्या सोहळ्यासाठी स्टेजवर उपस्थित राहिला. भारतीय खेळाडू ट्रॉफी घेण्यासाठी येत नसल्याचं लक्षात येताच नक्वीने एसीसीच्या अधिकाऱ्याला ट्रॉफी घेऊन जायला सांगितलं.
advertisement
आशिया कपच्या ट्रॉफीवरून झालेल्या या वादाचे पडसाद मंगळवारी एसीसीच्या बैठकीतही उमटले. राजीव शुक्ला आणि आशिष शेलार यांनी या मुद्द्यावरून मोहसिन नक्वीला घेरलं. नक्वीने ट्रॉफी वैयक्तिकरित्या ताब्यात ठेवली आहे, त्यामुळे लवकरात लवकर ट्रॉफी एसीसीच्या ऑफिसमध्ये आणावी, असं आशिष शेलार आणि राजीव शुक्ला बैठकीत म्हणाले. तसंच या मुद्द्यावरून आयसीसीकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही बीसीसीआयने दिला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 01, 2025 8:48 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'मी काहीही चूक केली नाही, टीम इंडियाला ट्रॉफी हवी असेल, तर...', 72 तासानंतर नक्वीची पहिली रिएक्शन

