मुंबई : ऐन दिवाळीत राज्याच्या पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होणार असल्याची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. आता ऐन दिवाळीच्या धामधुमीत बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याच्या चर्चांनी वेग धरला आहे.
advertisement
राज्यातील पोलीस यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर फेरबदल होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. येत्या आठवड्यात अपर पोलीस महासंचालक, पोलीस सहआयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक, महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची दाट शक्यता आहे. गृहविभागाने त्यासंदर्भातील तयारी पूर्ण केली असून, पात्र अधिकाऱ्यांच्या अंतिम यादीवर गुरुवारी शेवटचा हात फिरवण्यात आल्याची चर्चा पोलीस दलात रंगली होती.
एका वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तांनुसार, या बदल्यांमध्ये मुंबई पोलीस आयुक्तालय, एसीबी मुख्यालय, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, सायबर सेल, सुरक्षा विभाग, फोर्स वन, मिरा-भाईंदर आणि ठाणे-पलास विभागांतील वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश आहे. एकूण 90 उच्चपदस्थ अधिकारी, त्यात 58 ते 60 पोलीस उपायुक्त (DCP) दर्जाचे अधिकारी यांचे बदल्यांचे आदेश जाहीर होण्याची शक्यता आहे.
बदलीसाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी
मे, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात गृहविभागाने काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असल्या तरी अजूनही 60 हून अधिक अधिकारी त्या यादीतून राहिले आहेत. त्यामुळे अनेक अधिकारी एक वर्षाहून अधिक काळ त्याच पदावर कायम आहेत. दरम्यान, काही अधिकाऱ्यांनी बदलीला स्थगिती मिळवली असून, काहींनी पसंतीची ठिकाणे गृहविभागाला सुचवली आहेत. तर, डीसीपी दर्जाच्या काही अधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांच्या भेटी घेत चाचपणी सुरू केल्याची माहिती मिळते.
दिवाळीपूर्वी किंवा तत्काळ नंतर या बदल्या जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या फेरबदलांना राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
या बदल्यांमध्ये अपर पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी मिलिंद भारंबे, आशुतोष डुंबरे, निकित कौशिक, विश्वास नांगरे पाटील, मधुकर पांडे, यशस्वी यादव, कृष्ण प्रकाश आणि विनयकुमार चौबे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.