आता शपथविधीसाठी अवघे काही तास उरले आहेत. मात्र अजूनही भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बडे नेते वेटींगवर आहेत. त्यांना आपल्या पक्षनेतृत्वाकडून अद्याप फोन करण्यात आला नाही. त्यामुळे फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळातून संबंधित नेत्यांना डच्चू मिळणार असल्याचं बोललं जातंय. मंत्रीमंडळात स्थान न मिळणाऱ्या बड्या नेत्यांमध्ये भाजपचे 3, शिवसेना शिंदे गटाचे 4 तर अजित पवार गटाच्या 2 नेत्यांचा समावेश आहे.
advertisement
भाजपकडून माजी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना वेटींगवर ठेवलं आहे. मंत्रीमंडळाच्या शपथविधीबाबत त्यांना अद्याप कसलाही संदेश किंवा फोन करण्यात आला नाही. यात रवींद्र चव्हाण यांना पक्षनेतृत्वाने आजच महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या पदातून चंद्रशेखर बावनकुळेंना मुक्त करून त्यांची मंत्रीमंडळात वर्णी लावली आहे.
दुसरीकडे, एकनाथ शिंदे गटाकडून संजय राठोड, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर असे एकूण चार माजी मंत्री वेटींगवर आहेत. या चारही जणांचा मंत्रीमंडळातून पत्ता कट केला जाईल, असं आधीपासून बोललं जातं होतं. शपथविधीचा कार्यक्रम अवघ्या काही तासांवर आला असतानाही त्यांना मंत्रीमंडळाच्या शपथविधीसाठी आमंत्रित करण्यात आलं नाही.
हेच राष्ट्रवादीबाबत सांगायचं झालं तर, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांना वेटींगवर ठेवण्यात आलंय. लोकसभा निवडणुकीत दिलीप वळसे पाटील सक्रीय नव्हते, त्यांनी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार केला नाही, या आरोपामुळे त्यांचा मंत्रीमंडळातून पत्ता कट केल्याचं सांगितलं जातंय. पण छगन भुजबळ यांना वेटींगवर ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय. ओबीसी नेते म्हणून भुजबळांची महाराष्ट्रात ओळख आहे. मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, या मागणीला भुजबळांनी कडाडून विरोध केला होता. यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे विरुद्ध भुजबळ असा वाद उफाळून आला होता. याच कारणामुळे भुजबळांचा पत्ता कट केला असावा, अशी चर्चा आहे.