जळगाव: एका बाजूला कृषी क्षेत्रावरील अरिष्टाबाबत चिंता व्यक्त केली जात असताना दुसरीकडे पूरामुळे शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी होत असताना दुसरीकडे महायुती सरकारच्या मंत्र्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. लोकांना कर्जमाफीचा नाद लागला असल्याचं बेताल वक्तव्य महायुतीच्या मंत्र्याने केला आहे. या वक्तव्यावरून संताप केला जात आहे. शेतकरी संघटनांनी संताप व्यक्त करताना हे वक्तव्य शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं असल्याचे म्हटले आहे.
advertisement
जळगावमधील चोपडामध्ये बोलताना राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे. चोपडा पीपल्स को ऑप बँक चे घोडगाव येथे शाखेच्या उद्घाटन निमित्त सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आले असते त्यावेळेस ते बोलत होते यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराती, माजी मंत्री अनिल पाटील, माजी आमदार कैलास पाटील, दिलीपराव सोनवणे जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांच्यासह विविध पदावर असलेले राजकीय पदाधिकारी व गावातील नागरिक उपस्थित होते.
एका कार्यक्रमात बोलताना मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, जळगाव जिल्हा बँकेची किती वर्षापासून स्तुती ऐकत आले आहे काय बँकेची परिस्थिती होती मला सांगा आज तिथं काहीतरी राजकारण आल आहे काम करणाऱ्या माणसाला काम करू देत नाहीत असे त्यांनी म्हटले.
शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे वळले पाहिजे असं सांगताना नवीन तंत्रज्ञानानुसार व्यवसाय केला पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले. विविध कार्यकारी सोसायटीने अनेक काम करणार आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देश मध्ये बघितलं ही सहकार चळवळ तेवढी फोफावली नाही. आज पश्चिम महाराष्ट्रात सहकार चळवळ जोरात असल्याचे त्यांनी म्हटले.
लोकांना कर्जमाफीचा नाद....
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी म्हटले की, लोकांना कर्जमाफीचा नाद लागलेला आहे. आम्हाला निवडून यायचे आहे. त्यामुळे आम्ही निवडणुकीत काहीतरी आश्वासन देतो. लोकांनी ठरवायचे काय मागायचे, असे त्यांनी म्हटले. एखाद्या गावामध्ये निवडणुकीतील माणूस गेला आणि लोकांनी सांगितलं की आमच्या गावात नदी आणून देईल त्याला मतदान करणार. तर, निवडून यायचे म्हणून नदी आणून दिली जाईल असे आश्वासन दिले जात असल्याचे त्यांनी म्हटले.
यशवंतराव चव्हाण साहेबांनी उजनी धरण बांधलं आज त्याच्यामुळे कितीतरी उलाढाल झाली. सोलापूर जिल्ह्यात 32 कारखाने महाराष्ट्रात झाले. जायकवाडी धरण शंकरराव चव्हाण साहेबांनी उभं केलं असल्याचेही त्यांनी म्हटले.
शेतकरी संघटनेची टीका...
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला आहे अशा प्रकारचे संतापजनक विधान केले आहे. बाबासाहेब पाटील यांचे हे विधान अत्यंत संतापजनक असून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारे असल्याची प्रतिक्रिया अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केली आहे. अगोदरच अतिवृष्टीने शेतकरी हैराण आहेत. त्यात अतिवृष्टी मदतीचा शासनादेश काढला. त्यामध्ये अनेक अटी शर्ती टाकल्यामुळे व अनेक जिल्हे, गावे वगळल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात संताप असल्याचे त्यांनी म्हटले. निवडणुकीत कर्जमाफीचे दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांच्या मनात राग खदखदतो आहे. अशा पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना डीवचणारी आणि दुःखी करणारी विधाने मंत्री करणार असतील तर उद्रेक होऊन परिस्थिती हाताबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही डॉ. अजित नवले यांनी दिला.