खोपोली: खोपोली येथील शिवसेना शिंदे गटाचे नेते मंगेश काळोखे यांच्या खळबळजनक हत्याकांड प्रकरणात मोठी घडामोड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या दोन नेत्यांवर अटकेची टांगती तलवार आहे. नगर परिषद निवडणुकीच्या विजयाचा गुलाल अंगावरून उतरण्याच्या काही तासामध्ये शिंदे गटाचे मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. या हत्या प्रकरणात राजकीय संबंध असल्याचा आरोप करण्यात येत होता. पोलिसांनी काही आरोपींना अटक केली. आता, रायगडमधील राष्ट्रवादीचे दोन नेते अडचणीत येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. पनवेल जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.आर. चव्हाण यांनी या दोघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता घारे आणि भगत यांच्यावर अटकेची टांगती तलवार निर्माण झाली आहे.
काय आहे प्रकरण?
नगरपालिका निवडणुकीच्या राजकीय वैमनस्यातून २६ डिसेंबर रोजी खोपोलीत मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. तपासात ही हत्या २० लाख रुपयांची खंडणी देऊन घडवून आणल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १२ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, या हत्येच्या कटात सुधाकर घारे आणि भरत भगत यांचेही नाव फिर्यादीत असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
कोर्टात काय घडलं?
सुरुवातीला जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या प्रकरणात घारे यांचा थेट हस्तक्षेप दिसत नसल्याचे सांगत अटकेची घाई नसल्याचे सुतोवाच केले होते. मात्र, अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींची पोलीस कोठडी ९ जानेवारीपर्यंत असून तपास अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे. न्यायालयाने जामीन नाकारताना काही मुद्दे विचारात घेतले
या प्रकरणातील एका मुख्य आरोपीचा शोध अद्याप सुरू आहे. आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची आणि मागील गुन्ह्यांची तपासणी होणे आवश्यक आहे. तपासात अडथळा येऊ नये म्हणून सध्या जामीन देणे योग्य नसल्याचे कोर्टाने म्हटले.
सध्या सत्तेत असलेल्या महायुतीमधील दोन पक्षांच्या नेत्यांमधील हा संघर्ष आता कायदेशीर पेचात अडकला आहे. एका बाजूला शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याची हत्या आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांवर अटकेची टांगती तलवार, यामुळे रायगडच्या राजकारणात तणावाचे वातावरण आहे.
