आझाद मैदानावर गेल्या पाच दिवसांपासून उपोषणावर बसलेल्या जरांगे पाटलांनी अखेर विजयाचा गुलाल उधळला आहे. जरांगेंनी विजयाची घोषणा केल्यानंतर आझाद मैदान एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी दुमदुमलं. राज्यपालांच्या स्वाक्षरीनं हैदराबाद गॅझेटियरच्या अमंलबजावणीचा शासन निर्णय सरकारने काढला त्याचसोबत त्यांच्या इतर मागण्याही मान्य झाल्यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतलं... त्याचसोबत मराठा आणि कुणबी एकच असल्याचा शासन निर्णय काढण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ तर सातारा संस्थानचं गॅझेटियर लागू करण्यासाठी 1 महिन्यांची मुदत त्यांनी दिली आहे.
advertisement
लोकल रेल्वेच्या मार्गात अडथळा
मराठा आरक्षणासाठी असंख्य मराठा आंदोलकांनी विशेष करून दक्षिण मुंबईतील रस्ते,
शिवाजी छत्रपती महाराज स्थानक, मंत्रालय, हुतात्मा चौक परिसरातील रस्त्यांवरच ठिय्या मांडला.
परिणामी वाहतुकीचा खोळंबा झाल्यानं मुंबईकरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म तर घरच बनवले. जेवणासाठी, रात्री झोपण्यासाठी आणि जल्लोष करण्यासाठी सीएसएमटी स्थानक हे केंद्र झालं होतं. गोंधळ घालून लोकल रेल्वेच्या मार्गात अडथळा आणणं, त्यामुळे गर्दीच्या वेळेला लोकल खोळबंल्या होत्या.
बसच्या टपावर चढून केली जोरदार निदर्शने
एवढच नाही तर वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या बेस्ट बसच्या टपावर चढून काही आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली. अखेर आज मागण्या पूर्ण झाल्यानंतर आंदोलकांनी त्याच सीएमटी स्थानकावर मुंबईकरांची माफी मागितली आणि आपल्या गावाकडे रवाना झाले.
राज्य सरकारनं जरांगे पाटलांचं म्हणणं मान्य केलं
मराठा आरक्षण उपसमितीनं तयार केलेल्या मसुद्याप्रमाणे राज्य सरकारनं जीआर काढलाय. जरांगेंनी या मसुद्याला मान्यता दिली होती. हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याची मागणी जरांगे पाटलांनी मागील दोन वर्षांपासून सातत्यानं केली होती. मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेटियर हाच एकमेव पर्याय असल्याचं जरांगे पाटलांनी वारंवार सांगितलं होतं. अखेर राज्य सरकारनं जरांगे पाटलांचं म्हणणं मान्य केलंय.