जालना: मराठा आरक्षणासाठी निर्णायक आंदोलनाचा टप्पा असल्याचे जाहीर केल्यानंतर आता मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा बांधवाचा मोर्चा आता मुंबईच्या दिशेने निघाला आहे. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मराठ्यांच्या वादळाचा पहिला मुक्काम हा शिवनेरीवर असणार आहे. अंतरवालीतून निघताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकेचे बाण सोडले. पण, त्याच वेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे कौतुक केले.
advertisement
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर निर्णायक आंदोलनाची घोषणा केल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्याआधी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा समाज बांधवांना संबोधित केले. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. मराठा आरक्षणाच्या हक्कासाठी आता थांबायचं नसून शांततेत मुंबईच्या दिशेने जायचं असल्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. सरकारकडून जाणीवपूर्वक आपल्या मुंबई मोर्चाची अडवणूक असल्याचा आरोपही जरांगे यांनी अंतरवालीतून केला.
देवाभाऊंवर टीकेचे बाण...
जरांगे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, खोट्या हिंदूंकडून खऱ्या हिंदूंना त्रास दिलाय जातोय. आम्ही हक्क मागण्यासाठी मुंबईत जात आहोत, कोणताही धिंगाणा, दंगल करायला जात नाही. तरीही आमची अडवणूक कशाला करताय असा प्रश्न जरांगे यांनी केला. तुम्ही हिंदूविरोधी काम का करताय, हिंदुत्वाशी ज्यांचं देणंघेणं नाही, त्यांच्याकडून अडवणूक सुरू असल्याचा आरोप जरांगे यांनी सरकारवर केला. सणावाराच्या दिवशी हिंदूंना त्रास देण्यासाठीच पंतप्रधान मोदी आणि शाह यांनी मुख्यमंत्रीपदी फडणवीसांना बसवले का, असा सवाल जरांगे यांनी केला.
एकनाथ शिंदे-अजित पवारांचे कौतुक...
मंगळवारी माध्यमांशी बोलताना जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना प्रयत्न केले होते, असे म्हटले होते. त्यानंतर आज अंतरवालीत माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे कौतुक केले. जरांगे यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे हा खरा माणूस आहे. त्यांना गरिबांची व्यथा समजते, असेही जरांगे यांनी म्हटले. तर, अजितदादांचे कौतुक करताना जरांगे यांनी म्हटले की, अजित पवारही चांगले नेतृत्व आहेत. त्यांच्याकडे गेले की ते गोर गरिबांची कामे करुन देतात. भाजपमधील अनेक मंत्री चांगले काम करतात, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.