मनोज जरांगेंनी २०२३ सालापासून मराठा आरक्षणासाठी एकूण आठ आंदोलनं केली. तेव्हा राज्याचं नेतृत्व एकनाथ शिंदेंच्या हातात होतं. ती आंदोलनं शमवण्यासाठी जी आश्वासनं दिली त्याच्याच पूर्ततेसाठी जरांगे आता आक्रमक झालेत. मनोज जरांगेंच्या आत्ताच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी काहीशी अशी भूमिका घेतली.
तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन एकनाथ शिंदेंना थेट कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय, तो माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी. सोबतच ज्यांनी आरक्षणाची आश्वासनं दिली होती त्यांनीच आत्ता समाजाला उत्तर द्यावीत असा टोलाही लगावला. एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुदद्द्यावरुन सर्वपक्षीय नेत्यांची सावध पवित्रा घेतलेला असताना ओबीसी आंदोलनर्ते लक्ष्मण हाके मात्र कमालीचे आक्रमक झाले आहेत.
advertisement
मराठा आरक्षणाचा विषय आजवर महाराष्ट्रात राजकीय आणि सामजिक दृष्ट्या संवेदनशील विषय राहिला आहे. त्यामुळे आत्ताच्या या टप्प्यावर सरकार याविषयी कोणती भूमिका घेणार हे पाहावं लागेल. मात्र, या आंदोलनामुळे सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
दरम्यान, मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. तसंच विरोधकांना इशाराही दिला आहे. आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर तोंड भाजेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. तसंच मराठा आरक्षण समिती जरांगेंच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं.