'परवा भाजपच्या आमदारांनीच त्यांच्यावर आरोप केले की त्यांची जी टीम आहे, जरांगे हे या इव्हेंटमधलं प्यादं आहेत. याचा इव्हेंट रोहित पवार चालवतात, असं महाराष्ट्र म्हणतोय' असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला आहे.
भाजप आमदार परणीय फुकेंनीही जरांगेंच्या आंदोलनावर निशाणा साधला. 'जरांगेंचा अहंकार बोलत आहे, त्यांनी अशी अहंकारी भाषा वापरली नाही पाहिजे. ते एका समाजासाठी आणि उद्देशासाठी लढत आहेत. त्यांना आरक्षण नकोय, तर मीडियामध्ये सक्रीय राहायचं आहे, असं त्यांच्या वागण्यावरून वाटत आहे', अशी टीका परणीय फुके यांनी केली आहे.
advertisement
हाकेंनी जरांगेंवर टीका करतानाच, थेटपणे राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांचं नाव घेतलं, त्यामुळे हाकेंच्या या विधानाचे आता राजकीय पडसादही उमटू लागले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी मात्र हाकेंचे हे आरोप फेटाळून लावले. 'आपण एक सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे एकच विनंती आहे की राजकीय वक्तव्य करू नये. हे वक्तव्य ऐकल्यानंतर ते देवेंद्र फडणवीसांचंच वक्तव्य आहे की काय, असं वाटतं', असं प्रत्युत्तर रोहित पवारांनी दिलं आहे.
मनोज जरागेंनीही हाकेंच्याया आरोपांचा समाचार घेत, सत्ताधाऱ्यांवर पलटवार केला. 'ज्यांच्या ज्यांच्या खुमखुम्या आहेत ना, सगळ्यांच्या नीट करणार. सरकारी आंदोलनं कुणाची आहेत, त्यांच्याही खुमखुम्या नीट करणार. आता कुणावर बोलत नाही, पण मग सगळ्यांचा हिशोब करतो', असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे.
खरंतर मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाकेंमध्ये आरक्षणावरुन द्वंद्व सुरू आहे. जरांगेंचे आंदोलन होणार आणि त्यावर हाके बोलणार आणि हाकेंचं आंदोलन होणार आणि त्यावर जरांगे निशाणा साधणार, हे जणू सूत्र बनलंय. पण, आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सामाजिक विषयांचं राजकारणही तापल्याचं दिसतंय, त्यामुळे जरांगेंच्या उपोषणात पुढे काय काय घडतं? याकडे लक्ष लागलंय.