पोलिसांच्या माहितीनुसार, मोहन ज्योतिबा पवार (२६) व त्याची बहीण शामल ज्योतिबा पवार (२६) या दोघांनी मिळून गेल्या वर्षभरात आमदार पाटील यांना वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून अश्लील चॅट, फोटो आणि व्हिडिओ पाठवून त्रास दिला होता. एवढेच नव्हे तर “राजकीय प्रतिमा मलिन करू” अशी धमकी देत दहा लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती.
advertisement
आमदार शिवाजी पाटील यांनी सततच्या या त्रासामुळे ८ ऑक्टोबर रोजी ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर ठाणे आणि कोल्हापूर पोलिसांनी संयुक्त तपास करून मांडेदुर्ग गावातून दोघांना अटक केली.
प्राथमिक चौकशीत समोर आले की, आरोपी मोहन पवार आणि त्याची बहिण शामल यांनी ‘मैत्रीच्या’ नावाखाली आमदार पाटील यांच्याशी संपर्क साधून, नंतर अश्लील मजकूर पाठवत हनी ट्रॅपचा कट रचला होता. सुरुवातीला आमदारांनी त्रास सहन करून संबंधित नंबर ब्लॉक केले, मात्र आरोपींनी नवीन नंबर वापरून त्रास सुरू ठेवला.
दरम्यान, गुन्हा उघड झाल्यानंतर आरोपी मोहन पवार स्वतः आमदारांच्या कार्यालयात हजर होऊन “माझी चूक झाली, माफ करा” अशी विनंती केली, परंतु पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत बहिणीचा सहभागही स्पष्ट झाल्याने तिलाही अटक करण्यात आली आहे. तपासात समोर आले आहे की, मोहन पवार हा मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे संकेत मिळाले आहेत. तथापि, पोलिस आता या प्रकरणामागील नेमका हेतू – राजकीय की आर्थिक – याचा शोध घेत आहेत.
या घटनेमुळे चंदगड व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. समाजातील वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर, ‘ऑनलाइन मैत्रीचे’ सापळे आणि डिजिटल ब्लॅकमेलिंगपासून सावध राहण्याची गरज असल्याचे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. चितळसर पोलीस ठाण्यांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, लवकरच आणखी तपशील उघड होण्याची शक्यता आहे.