बेस्ट कर्मचारी पतसंस्थेच्या या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राज ठाकरे यांच्या मनसेनं एकत्र येऊन एकच पॅनल उभं केलं होतं. या दोघांनीही एकत्र येण्याचे संकेत दिले होते त्या दृष्टीनं त्यांनी एक पाऊल उचललं असून संपूर्ण महाराष्ट्राला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. तर, भाजपचे आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, नितेश राणे, शिंदे गटाचे किरण पावसकर यांच्या कामगार संघटनांनी एकत्रित येत सहकार समृद्धी पॅनेल उभं करत आव्हान दिले होते. मात्र, निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या पॅनल आणि प्रसाद लाड-प्रवीण दरेकर यांच्या 'समृद्ध' पॅनेलचा पराभव करत, शशांक राव यांच्या पॅनेलने निर्णायक विजय मिळवला.
advertisement
बेस्ट पतपेढी निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंत यांनी थेट भाजपवर निशाणा साधला आहे. “आमचा पराभव झाला, पण जिंकलेल्यांचं मी अभिनंदन करतो. मात्र हा निकाल पैशाच्या जोरावर पालटला गेला,” असा घणाघात सामंत यांनी केला.
पैसे त्यांचे पण मत आम्हाला मिळतील...
निकालानंतर प्रतिक्रिया देताना सामंत म्हणाले, “बेस्टमधील 12 हजार कर्मचारी माझ्यासोबत होते, तरीही आमचा पराभव झाला. मागील आठवडाभरापासून प्रचंड पैशाचा ओघ या निवडणुकीत पाहायला मिळाला. आम्हाला वाटलं की कर्मचारी पैसे घेतील, पण मतदान मात्र आम्हालाच करतील. मात्र तसं झालं नाही. पैशासमोर आम्ही कमी पडलो असल्याचे सामंत यांनी म्हटले.
भाजपवर आरोप करताना सामंत म्हणाले, “बेस्ट वाचवण्यासाठी मी प्रयत्न केले. पण भाजपने पैसा लावला, आपला अधिकार वापरला. आम्ही मतदारांशी संपर्क साधण्यास आणि पैसा लावण्यात कमी पडलो. मला आश्चर्य वाटतं की भाजपसारखा पक्ष एका पतपेढीच्या निवडणुकीसाठी एवढी मोठी यंत्रणा वापरतो. त्यांचं हे काम कौतुकास्पद म्हणावं लागेल, पण त्याचबरोबर लोकांना सांगावे लागेल की ही एक चिंतेची बाबदेखील असल्याचे त्यांनी म्हटले.