दादर येथील कबुतरखान्यावरील वाद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. महानगर पालिकेच्या पथकाकडून दादर येथील कबुतरखान्यावर शेड लावण्यात आले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या कबूतर खाण्यात पक्षांना खाणं टाकणाऱ्या लोकांवर मुंबई महानगरपालिकाकडून दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात झाली होती. आज सकाळी जैन समाज बांधवांनी आक्रमक होत आंदोलन केले. महापालिकेने लावलेली ताडपत्री, शेड आंदोलनकर्त्यांनी काढून टाकले. महापालिकेची बंदी असतानादेखील कबुतरांसाठी दाणे टाकण्यात आले.
advertisement
महापालिकेची भूमिका काय?
कोर्टाच्या निर्देशानुसार कबुतरखान्यावर तात्पुरती बंदी कायम ठेवण्यात आली असून, पुढील आदेश येईपर्यंत ते सुरू करण्यात येणार नाही, अशी माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणातील वस्तुस्थिती न्यायालयासमोर स्पष्टपणे मांडण्यासाठी एक विशेष समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही समिती कबुतरखान्यांची सद्यस्थिती, नागरिकांची प्रतिक्रिया आणि कायद्याच्या दृष्टीने बाबींचा आढावा घेऊन कोर्टात आपली निरीक्षणे सादर करणार आहे.
दादर कबुतरखान्याजवळ झालेल्या आंदोलनानंतर महापालिकेने कोणतीही दबावाची भूमिका घेतली नसल्याचे दिसून आले आहे. महापालिका प्रशासन फक्त न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कबुतरखान्यावर टाकलेली ताडपत्री महापालिका सध्या हटवणार नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. “न्यायालय जे आदेश देतील, त्यानुसारच आम्ही कारवाई करू. सध्या कोर्टाने आम्हाला आणि पोलिसांना जे निर्देश दिले आहेत, त्याचेच पालन केले जात आहे,” अशी प्रतिक्रिया महापालिकेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.
दादरमध्ये राडा...
आज, सकाळी दादरमधील जैन मंदिरात प्रार्थना सभा झाली. या सभेनंतर अचानक एक मोठा जमाव रस्त्यावर आला. या पुरुष-महिलांचा समावेश असलेल्या या जमावाने थेट कबुतरखान्याच्या दिशेने धाव घेतली. यावेळी पोलिसांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने पोलिसांना धक्काबुक्की केली. त्यानंतर जमावातील एका गटाने थेट कबुतरखान्यावर असलेले ताडपात्रीचे शेड हटवले. या जमावाने मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने बंद करण्यात आलेला कबुतरखाना खुला करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी शेडची तोडफोड करण्यात आली. ताडपात्री हटवण्याचा प्रयत्न केला.