महापालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचं विसर्जन असल्याचं बोललं जात आहे.
उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी महापालिका निवडणुकीबाबत केलेल्या वक्तव्यांवरून मुंबई महापालिकेत महाविकास आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्चचिन्ह निर्माण झालंय. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहेत. या युतीची उत्सुकता फक्त राज्यातच नाही तर देशपातळीवरही आहे. अशातच दिल्ली दौऱ्यावर असताना राज ठाकरेंबाबत विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरात कोणताही राजकीय पक्ष किंवा नेत्याचा दबाव सहन करणार नसल्याचा इशाराच एक प्रकारे उद्धव ठाकरे यांनी दिला.
advertisement
दुसऱ्यांना याबाबत चर्चा करायची गरज नाही, आम्ही दोघे निर्णय घेण्यास सक्षम आहोत, असे युतीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याची री खासदार संजय राऊतांनी ओढलीय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणतीही आघाडी तयार झालली नसल्याचे सांगत मुंबईबाबत निर्णय घेण्यास उद्धव आणि राज ठाकरे समर्थ असल्याचे राऊतांनी सांगितलंय
मविआ विधानसभेसाठी निर्माण झाली. इंडिया आघाडी लोकसभेसाठी निर्माण झाली. स्थानिक निवडणुकांसाठी कोणती आघाडी निर्माण झाल्याचं सांगा? मुंबईबाबत राज आणि उद्धव ठाकरे निर्णय घेण्यास समर्थ आहेत, असे राऊत म्हणाले. दुसरीकडे महापालिका युतीबाबत दोन्ही भाऊ बोलून निर्णय घेतील, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
महाविकास आघाडीच्या शिल्पकारांपैकी एक असलेल्या शरद पवारांनीही महाविकास आघाडीत महापालिका निवडणुकांबाबत चर्चा झाली नसल्याकडे लक्ष वेधलं. तर काँग्रेस नेत्यांनीही राऊतांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. महापालिका निवडणुकांबाबत अद्याप चर्चा नाही. स्थानिक निवडणुकीबाबतचे निर्णय स्थानिक पातळीवर होतात, असे काँग्रेस नेते वडेट्टीवार म्हणाले.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेवर ठाकरेंच्या पक्षाची सत्ता आहे. ठाकरेंच्या हातून महापालिकेची सत्ता हिसकावून घेण्याचा सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचा मनसुबा आहे. तर पालिकेवरची सत्ता कायम ठेवण्याचा ठाकरेंचा प्रयत्न आहे. अशातच महापालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा असताना मुंबई महापालिका निवडणुकीत मविआचं विसर्जन होणार अशी शक्यताही व्यक्त केली जातेय.