मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आझाद मैदानात मनोज जरांगे यांनी बेमुदत उपोषण पुकारले आहे. आज आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे. सोमवारी हायकोर्टात या आंदोलनावर झालेल्या सुनावणीनंतर प्रशासन आणि मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. आज हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. दुसरीकडे पोलिसांनी जरांगेंना आझाद मैदान रिकामं करण्याची नोटीस बजावल्यानंतर आता आंदोलकांच्या गाड्या हटवण्यास सुरुवात केली आहे.
advertisement
हायकोर्टाने आझाद मैदान वगळता दक्षिण मुंबईतील इतर ठिकाणे रिकामी करण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी दिले. त्याशिवाय, वाहतुकही सुरळीत करण्याचे आदेश दिले. हायकोर्टाच्या निर्देशानंतर मराठा आंदोलकांनी आपली वाहने हटवण्यास सुरुवात केली आहे. तर, दुसरीकडे पोलिसांनी ठरवलेल्या पार्किंगमधूनही गाड्या हटवण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.
मराठा आंदोलकांची वाहने मोठ्या प्रमाणावर शहरात दाखल झाली होती. आंदोलकांना अन्न-पाणी पुरवणाऱ्या वाहनांची यामध्ये लक्षणीय संख्या होती. या वाहनांमुळे आणि आंदोलकांच्या गर्दीमुळे मुंबई महापालिका परिसरासह दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. सोमवारी हायकोर्टाने निर्देश दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.
पार्किंगमधील वाहने काढण्याचे आदेश...
मुंबई पोलिसांनी वाडी बंदर परिसरात असलेल्या गाड्या काढण्यास सुरुवात केली आहे. पूर्व मुक्त मार्गाच्या खाली असलेल्या रस्त्यावरील मराठा आंदोलकांच्या गाड्या हटवून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची सूचना करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याची विनंती पोलिसांकडून आंदोलकांकडून करण्यात येत आहे. पोलिसांच्या या कार्यवाहीमुळे ऑरेंज गेट, वाडी बंदर, भाऊचा धक्का, पूर्व मुक्त मार्ग, बी पी टी रोड परिसर मोकळा होण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
दक्षिण मुंबईने घेतला मोकळा श्वास...
मुंबईतील दक्षिण मुंबईने मोकळा श्वास घेण्यास सुरुवात केली आहे. गेली चार दिवस जे जे उड्डाणपूल ते सीएमएमटी चौक तसंच मेट्रो सिनेमा चौक ते मुंबई मनपा चौक तब्बल 11 हजारा पेक्षा जास्त गाड्या मराठा आंदोलकांनी आणल्या होत्या. तर 40 ते 45 हजार पेक्षा जास्त आंदोलक या परिसरात होते. पण काल मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर या परिसरातील सर्व गाड्या काढण्यात आल्या आहेत.