भारतीय हवामान खात्याने आज मंगळवार, दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात (मुंबई शहर आणि उपनगरे) अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आपत्कालीन कार्यालयाची सेवा सोडून सर्व खासगी कार्यालये आणि आस्थापना यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने महानगरपालिकेकडून आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. संबंधित कार्यालये, आस्थापना यांनी कामकाजाच्या स्वरूपानुसार, कर्मचाऱ्यांना घरी राहून कामकाज (वर्क फ्रॉम होम) करण्याच्या सूचना तातडीने देण्याचे आदेश मुंबई महापालिकेने दिले आहेत.
advertisement
मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली
भरतीला सुरुवात झाल्याने मुंबईतील मुख्य नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिठी नद्यीचे फ्लडगेट बंद झाले. त्यानंतर मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. पावसाच्या पाण्याचा विसर्ग करण्यासाठी वापरात असणाऱ्या आपत्तीकालीन दरवाजे सध्या बंद करण्यात आल्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांना आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं मुंबई, ठाणे, पालघरसह नवी मुंबई, रायगड, मीरा भाईंदर, पनवेल आणि रत्नागिरीतल्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आज दिवसभर मुंबईत दाणादाण उडाली. सखल भागात मोठ्या प्रमाणात साचलं होतं. परिणामी रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वेच्या ट्रॅकवर पाणी साचल्यानं लोकलची वाहतुकीही संत गतीनं सुरू होती. या सर्व बाबींचा विचार करून सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली.