नागपूर : नागपूरच्या मार्टीन नगरमध्ये पती-पत्नीने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. या दाम्पत्याने गळफास लावण्याआधी व्हिडिओही बनवला. बेरोजगारी आणि मुल होत नसल्यामुळे निराश होऊन आपण जीवन संपवत असल्याचं ते या व्हिडिओमध्ये म्हणाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे लग्नाच्या वाढदिवशीच या दाम्पत्याने गळफास लावून घेतला आहे.
नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मार्टीन नगर भागात ही घटना घडली आहे. मागच्या चार ते पाच वर्षांपासून बेरोजगारीमुळे आणि मुल बाळ होत नसल्यामुळे हे पती-पत्नी त्रस्त होते, यालाच कंटाळून त्यांनी टोकाचा निर्णय घेतला आह. गळफास लावून घेण्याआधी त्यांनी मोबाईलमध्ये एक व्हिडिओही रेकॉर्ड केला, ज्यात त्यांनी जीवन संपवण्याचं कारण सांगितलं आहे.
advertisement
पाच वर्षांपासून बेरोजगार
मिळालेल्या माहितीनुसार मृत पती जरील उर्फ टोनी ऑस्कर मोन्किप हा चार वर्षांपूर्वी एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करत होता, तर पत्नी ॲनी जरिल मोन्किप ही गृहिणी होती. जरीलची नोकरी गेल्यानंतर दोघंही चार ते पाच वर्ष बेरोजगार होते, या बेरोजगारीला दोघंही कंटाळले होते.
मुल नसल्याने नैराश्य
लग्नाला 26 वर्ष झाली तरी मुलबाळ झाले नाही, त्यामुळेही जरील आणि ॲनी यांच्यातलं नैराश्य वाढत गेलं. सोमवारी रात्री दोघंही फिरायला गेले होते, यानंतर दोघंही जेवण करून घरी परतले. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पत्नी ॲनीने व्हिडिओ बनवून नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना मुलांची काळजी घ्यायला सांगितलं, तसंच लग्नाचा कार्यक्रम पुढे ढकलू नका, असंही सांगितलं. यानंतर दोघांनीही घराच्या छताला दोरी बांधून गळफास लावून घेतला.
