राहुल सचिन गुप्ता असं हत्या झालेल्या गुंडाचं नाव आहे. राहुलवर चोरी, शस्त्र प्रतिबंधक कायदा, मारहाण, घरफोडी यांसारखे एकूण ११ गुन्हे दाखल आहेत. २४ डिसेंबरच्या सायंकाळी राहुल गुप्ता याला मंदिरामागं बोलावून त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी राहुलचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. राजा अश्फाक शेख असं आरोपीचं नाव आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत गुंड राहुल गुप्ता याचे राजा अश्फाक शेख याच्या वहिनीसोबत अनैतिक संबंध सुरू होते. तो अनेकदा राजा शेख याच्या वहिनीचा पाठलाग करायचा, तिला त्रास द्यायचा. ही बाब लक्षात आल्यानंतर राजा शेख याने राहुल गुप्ताला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण दोघांमध्ये वाद झाला. यातूनच हे हत्याकांड घडलं. घटनेच्या दिवशी २४ डिसेंबरला आरोपी राजाने गुंड राहुलला समजावून सांगण्यासाठी त्याला आदिवासी प्रकाश नगर परिसरातील एका मंदिराच्या मागे बोलावलं होतं.
याठिकाणी राजाने गुंड राहुल गुप्ताला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच वहिनीचा पाठलाग करून त्रास देऊ नको, असं सांगितलं. पण यावरून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी संतापलेल्या राजाने बाजुलाच पडलेल्या लाकडी दांड्याने राहुलवर हल्ला केला. त्याच्या डोक्यांत वार करत राहुलला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं. या घटनेची माहिती राहुलच्या आईला मिळाल्यानंतर त्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी जखमी मुलाला आपल्या घरी नेलं. उपचार घेण्यासाठी डॉक्टरांकडे चल, अशी विनवणी राहुलकडे केली. पण राहुलने रुग्णालयात जाण्यास नकार दिला. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी 25 डिसेंबरला राहुलच्या आईने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो बेशुद्धावस्थेत दिसला. त्यानंतर त्याला तातडीने मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र तपासणीदरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी राजा अश्पाक शेख याला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.
