फक्त एक चूक आणि थेट मृत्यूच्या दारात
18 फेब्रुवारी 2004 रोजी संध्याकाळी संजय कुमार गुप्ता हे आपलं नियमित काम आटपून दुचाकीवरून घरी जात होते. अनावधानाने दुचाकीचा साईड स्टँड काढायला विसरल्यामुळे अचानक अपघात झाला. या अपघाताने त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. अनेक दिवस कोमामध्ये राहिल्यानंतर जणू त्यांना दुसरा जन्म मिळाला. चालणं, बोलणं, आठवण ठेवणं सगळंच पुन्हा नव्याने शिकावं लागलं.
advertisement
ना खास क्लास, ना महागडं प्रशिक्षण, ZP शाळेचे विद्यार्थी बोलतायेत जापनिज, कसं झालं शक्य?
20 वर्षांपासून करतात जनजागृती
या भीषण अनुभवातून सावरताना संजय गुप्ता यांनी एक ठाम निर्णय घेतला. आपल्यावर ओढावलेला प्रसंग दुसऱ्या कुणावरही येऊ नये. याच विचारातून त्यांनी रस्ते सुरक्षेच्या जनजागृतीला सुरुवात केली. गेल्या 20 वर्षांपासून ते नागपूरच्या रस्त्यांवर हातात बॅनर घेऊन उभे राहतात. ट्रॅफिक नियम पाळा, हेल्मेट वापरा, वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळा, जीवन अमूल्य आहे, असे संदेश देत ते नागरिकांमध्ये जागृती निर्माण करत आहेत.
पेशाने मेडिकल रिप्रेझेंटिव्ह असलेले संजय गुप्ता आपल्या दैनंदिन जीवनातील फावल्या वेळेत हे कार्य करत आहेत. काही लोक त्यांना वेडे समजतात, तर काही जण त्यांच्या कार्याचा गौरव करतात. मात्र, या प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करत ते अविरतपणे जनजागृती करत असल्याचं त्यांनी सांगितलं. इतकंच नव्हे, तर गेल्या अनेक वर्षांपासून ते शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेचे महत्त्व समजावून सांगतात.
नागपूरसह पुणे, मुंबई, अमरावती, भंडारा, अहिल्यानगर यांसारख्या अनेक शहरांमध्ये त्यांचे हे कार्य सुरू आहे. आयुष्य पुन्हा संधी देत नाही, हा संदेश देत संजय गुप्ता नागरिकांना वाहन चालवताना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन करतात. हेल्मेटसारख्या छोट्या गोष्टीदेखील जीव वाचवू शकतात, असं सांगत ते आजही रस्त्यावर उभे राहून लोकांना सावध करत आहेत. अपघातातून उभे राहून हजारो लोकांचं जीवन वाचवण्याचा प्रयत्न करणारे संजय कुमार गुप्ता आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.





