नाशिकमध्ये भाजपकडून जोरदार पक्षबांधणी सुरू आहे. नाशिक महापालिकेसह जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी अनेक महत्त्वाच्या नेत्यांचे प्रवेश भाजपात होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे हे आज भाजपात प्रवेश करणार आहेत. भारत कोकाटे यांच्या पक्ष प्रवेशामुळे माणिकराव कोकाटे यांना घेरण्यासाठी भाजपला मोठी संधी मिळाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात येणार आहे.
advertisement
भारत कोकाटे हे सिन्नर येथील सोमठाणेच्या सरपंच म्हणून काम करत आहेत. नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन आणि विशेष कार्यकारी सोसायटी अशा विविध पदांवर भारत कोकाटे यांनी काम केले आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत घरातूनच विरोध झाला होता. गेली काही वर्ष त्यांचे सख्खे भाऊ भारत कोकाटे आणि मंत्री कोकाटे यांच्या कुटुंबीयांत मतभेद निर्माण झाले आहे. या मतभेदाचा परिणाम कोकाटे यांच्या राजकारणावरही होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भारत कोकाटे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत सिन्नरमध्ये चांगलीच मोर्चेबांधणी करण्यात आली होती. त्याच्या परिणामी ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना चांगले मतदान झाले, असे म्हटले जाते.
भारत कोकाटे यांच्या भाजप पक्ष प्रवेशामुळे ठाकरे गटालाही ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी धक्का बसणार आहे. तर, दुसरीकडे आता सिन्नरमधील समीकरणे वेगाने बदलणार असल्याचा अंदाज आहे. भाजपने अजितदादांसाठी महत्त्वाच्या असलेल्या पुण्यानंतर आता नाशिक जिल्ह्यातही त्यांना धोबीपछाड देण्याची तयारी सुरू केली आहे.