नाशिक शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखा युनिट एकने अत्यंत गोपनीय पद्धतीने सापळा रचून या टोळीतील चार संशयितांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 17 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
हॉटेलजवळ सापळा रचून मुख्य आरोपीला अटक
पोलिसांना गुप्त सूत्रांकडून माहिती मिळाली होती की, या ड्रग्स विक्री टोळीचा मुख्य संशयित आरोपी मुजफ्फार उर्फ मुज्जू शेख हा शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलजवळ एमडी ड्रग्स विक्रीसाठी येणार आहे. या माहितीच्या आधारावर, गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेल परिसरात कडेकोट सापळा रचला. संशयित मुज्जू शेख तिथे पोहोचताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्याच्या तीन साथीदारांना देखील अटक केली.
advertisement
जप्त केलेल्या मुद्देमालात महिलेचाही सहभाग
अटक केलेल्या चार संशयितांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे, ज्यामुळे या टोळीच्या जाळ्याचा विस्तार अधिक असल्याचे स्पष्ट होते. पोलिसांनी या टोळीकडून एमडी ड्रग्स आणि ड्रग्स विक्रीसाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य जप्त केले आहे, ज्याची एकूण किंमत १७ लाख १५ हजार रुपये इतकी आहे.
नाशिक शहराला अमली पदार्थमुक्त करण्याच्या दिशेने नाशिक पोलिसांनी उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे शहरातील ड्रग्स पुरवठा साखळीला मोठा धक्का बसला आहे. पोलिस आता या टोळीच्या मुख्य पुरवठादाराचा आणि त्यांच्या नेटवर्कचा शोध घेत आहेत.