Navratri 2025 : भक्तीमय आविष्कार! शंख-शिपल्यातून साकारली आदिशक्ती, सुंदर कलेचा Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
शारदीय नवरात्रीच्या निमित्ताने देवीच्या विविध रुपांचा जागर सर्वत्र होतोय.सांगलीच्या देवराष्ट्रे गावातील शिल्पकार रवी शिंदे यांनी शंख शिंपल्यांपासून साकारलेली आदिशक्तीची मूर्ती लक्षवेधी ठरली आहे.
सांगली: शारदीय नवरात्रीच्या निमित्ताने देवीच्या विविध रूपांचा जागर सर्वत्र होतोय. प्रत्येक भक्त निरनिराळ्या माध्यमातून देवीची आराधना करतोय. अशातच काही कलाकार आपल्या कलेतून अनोख्या पद्धतीने भक्तिभाव व्यक्त करतात. यापैकीच सांगलीच्या देवराष्ट्रे गावातील शिल्पकार रवी शिंदे यांनी शंख-शिंपल्यांपासून साकारलेली आदिशक्तीची मूर्ती लक्षवेधी ठरली आहे.
शिल्पकार रवी शिंदे यांना बालपणी गुहागरच्या समुद्रकिनाऱ्याचा सहवास लाभला. तिथेच त्यांना वेगवेगळ्या आकाराच्या शंख-शिंपल्यांचे आकर्षण वाटले. त्यातून आठ-दहा वर्षे त्यांनी शंख-शिंपल्यांचा संग्रह जमवला आहे. प्रत्येक शंख-शिंपल्याच्या आकाराची, रंगाची सतत भुरळ राहिल्याचे शिल्पकार रवी सांगतात. स्वतःमधील प्रतिभा ओळखून त्यांनी जी.डी.आर.चे शिक्षण पूर्ण केले आहे.
advertisement
शंख-शिंपल्यांचे आकर्षण
कॅनव्हास पेंटिंग करत असताना आपल्या संग्रहातील शंख-शिंपले सतत डोळ्यासमोर येत राहिले. यातूनच शंख-शिंपल्यांना कलात्मकपणे मांडण्याची कल्पना त्यांना सुचली. विद्येची देवता असणाऱ्या श्री गणेशाची मूर्ती शंख-शिंपल्यांपासून त्यांनी प्रथम साकारली. बाप्पाची मूर्ती साकारताना त्यांची प्रतिभा आणखी खुणावत राहिली. यातूनच पुढे त्यांनी विविध पक्षी, प्राणी यासह विठ्ठोबाची मूर्ती देखील शंख-शिंपल्यापासून साकारली. गेल्या अनेक वर्षांपासून शंख-शिंपल्यांचा छंद जोपासत यंदा त्यांनी देवीची हुबेहूब, प्रसन्न रूप असलेली अप्रतिम मूर्ती साकारली आहे.
advertisement
अशी आहे शंख-शिंपल्यापासून साकारलेली आदिशक्ती
वेगवेगळ्या आकाराचे शंख-शिंपले कलात्मकतेने वापरून शिल्पकार रवी यांनी आदिशक्ती अंबाबाईची मूर्ती साकारली आहे. या मूर्तीची उंची जवळपास एक फूट इतकी असून देवीच्या केवळ चेहऱ्यासाठी त्यांनी रंगाचा वापर केला आहे. मूर्तीमध्ये दिसणारे इतर रंग शंख-शिंपल्यांचे नैसर्गिक रंग असल्याचे रवी सांगतात.
शंख-शिंपल्यांसारख्या नाजूक नैसर्गिक वस्तूंना कलात्मकतेने आकार दिला आहे. आदिशक्तीच्या या मूर्तीमध्ये जिवंतपणा दिसतो. प्रचंड संयमी, एकाग्र आणि संवेदनशील कलाकार म्हणून रवी शिंदेंचे कौतुक होत आहे. त्यांनी शंख-शिंपल्यापासून साकारलेल्या आदिशक्तीच्या प्रसन्न मूर्तीतून त्यांच्या कलात्मक प्रतिभेचा आणि परिश्रमाचा अद्भुत अविष्कार पहायला मिळतो आहे.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
October 01, 2025 3:01 PM IST
मराठी बातम्या/सांगली/
Navratri 2025 : भक्तीमय आविष्कार! शंख-शिपल्यातून साकारली आदिशक्ती, सुंदर कलेचा Video