गेल्या काही दिवसात गुन्हेगारांच्या उच्छादानं हैराण झालेल्या नाशिकातील ही दृष्य.. नाशिक पोलिसांनी गुन्हेगारांना बेड्या ठोकत आता त्यांची धिंड काढायला सुरुवात केलीय.नाशिक शहरात गेल्या 9 महिन्यात 46 खुनाच्या घटना घडल्यानंतर नाशिक पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्यात. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत छोटे मोठे गुन्हेगारच नाही तर ज्यांनी गुन्हेगारी टोळ्या चालवण्यासाठी राजाश्रय दिला अशा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनाही बेड्या ठोकत पोलीसी खाक्या दाखवलाय.
advertisement
नाशिकमधील गुन्हेगारी टोळ्यांचं धाबं चांगलंच दणाणलंय
नाशिक पोलिसांनी सत्ताधारी पक्षातील आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्यासह त्यांच्या टोळीवर,
तसंच नुकतेच शिंदे गटात गेलेले विक्रम नागरे, योगेश शेवरे, पवन पवार याच्यासोबतच भाजपत गेलेले मामा राजवाडे,भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव निमसे , जगदीश पाटील यांनाही गजाआड केलं आहे.पोलिसांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवरच कायद्याचा बडगा उगारल्यानं नाशिकमधील गुन्हेगारी टोळ्यांचं धाबं चांगलंच दणाणलंय.
पोलिसांच्या कामगिरीचं भरभरून कौतुक
पोलिसांनी केलेल्या या कारवाईवर मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही पोलिसांचं कौतुक करत शाबासकीची थाप दिलीय. पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे नाशिककरांना दिलासा मिळालाय. नागरिकांनीही पोलिसांच्या समर्थनार्थ शहरात ठिकठिकाणी होर्डिंग लावलेत.तर काही नागरिकांनी I SUPPORT NASHIK POLICE असे बॅनर हातात घेत नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी घोषणाबाजी करत पोलिसांच्या कामगिरीचं भरभरून कौतुक केलंय.
तक्रारी करण्याचे आवाहन
नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नाशिककरांनी न घाबरता पुढे येऊन गुन्हेगारांविरोधात तक्रारी करण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केल आहे. नाशिक पोलिसांनी सत्ताधाऱ्यांच्या छत्राखालील गुन्हेगारांवर धडाकेबाज कारवाई केलीय. त्यामुळं निदान नाशिकमधील गुन्हेगारीवर तरी खरोखरच ‘कायदा भारी,पोलीस जबरी’ असं म्हणता येईल