तब्बल तीस वर्ष ठाकरे यांच्या शिवसेनेत एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून काम केलेले ठाकरेंच्या सेनेतील महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. विलास शिंदे यांनी एकट्यानेच ठाकरेंची साथ सोडली असे नाही तर आज तब्बल ८ नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती आणि बाजार समिती यांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील विलास शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदेंचा सेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. विलास शिंदे यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे सेनेला ८ ते १० जागांवर फायदा होणार आहे. येणाऱ्या पालिका निवडणुकीत आपण आपण स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकवून दाखवू असा विश्वास विलास शिंदे यांनी पक्षप्रवेशावेळी बोलून दाखवला.
advertisement
विलास शिंदे यांनी आज दीड हजाराहून अधिक वाहने घेऊन मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शन केले. संजय राऊत यांनी विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्नाला काही आठवड्यापूर्वीच कुटुंबासोबत हजेरी लावली. त्या संजय राऊत यांना आजच्या पक्षप्रवेशाबाबत विचारले असता, कोण विलास शिंदे? असे उत्तर देत पक्षफुटीवर बोलणे त्यांनी टाळले.
विलास शिंदे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत केलेल्या शिवसेना पक्षप्रवेशावर बोलताना उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनीही जोरदार टोलेबाजी केली. प्रवेशाची इतकी मोठी यादी वाचताना एकनाथ शिंदे यांनी तिकडे काही शिल्लक ठेवले की नाही अशी मिश्किल टिप्पणी करत, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है! असे म्हणत विलास शिंदे यांच्या पक्षप्रवेशाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नाशिक महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल असा विश्वास आपल्या मनात निर्माण झाल्याचे भावना शिंदे यांनी व्यक्त केली.
नाशिकमधील ठाकरे यांच्या शिवसेनेने जाहीर केलेला नव्या कार्यकारणीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेत अवघ्या पंधरा दिवसात दोन बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने ठाकरे सेनेला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीपूर्वी ताकदीचे नगरसेवक आणि पदाधिकारी पक्षांतर करत असल्याने येणाऱ्या निवडणुकीत ठाकरेंना मोठा धक्का बसेल हे निश्चित. मात्र दुसरीकडे महायुतीला मात्र या नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींचा फायदा होणार असल्याने ठाकरे सेनेतील कलह महायुतीच्या पथ्यावर पडत आहे. त्यामुळे ठाकरे सेना आता हे पक्षांतर रोखण्यासाठी काय रणनीती आखणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.