सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिक रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर आली. गाडीतील प्रवाशांची गाडीतून उतरण्याची आणि प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांची गाडीत चढण्याची घाई होती. अशीच घाईघाईत ट्रेनमधून उतरणारी महिला. जिच्या हातात तिची दोन वर्षांची मुलगी होती. ट्रेनमधून उतरताना मुलगी आईच्या हातातून निसटली ती थेट रेल्वेखाली गेली. रेल्वे रूळांवर ही मुलगी पडली.
advertisement
मुलीला वाचवायला आला 'देवदूत'
मुलगी रेल्वेखाली जाताच लोकांची गर्दी झाली. याचवेळी रेल्वेतून प्रवास करत होते जे जळगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस फिरोज तडवी. जळगावहून ते नाशिकला ट्रेनने आले होते. त्यांच्यासमोर हा सर्व प्रकार घडला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मुलीला वाचवण्यासाठी धाव घेतली.
ट्रेनला ग्रीन सिग्नल मिळाला होता. ट्रेन सुटणारच होती. तरी आपल्या जीवाची पर्वा न करता फिरोज तडवी रेल्वेच्या खाली गेले आणि त्यांनी त्या मुलीला रेल्वेखालून बाहेर काढलं. मुलीला आईच्या ताब्यात दिलं. तेव्हा कुठे सर्वांच्या जीवात जीव आला. रेल्वे स्टेशनवरील ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.
पोलिसाचं कौतुक
चिमुकलीसाठी पोलीस फिरोज तडवी देवदूतासारखेच धावून आले. म्हणूनच मृत्यूच्या दारातून ही चिमुकली परत आली. या कामगिरीबद्दल उपस्थित सर्वांनी पोलीस कर्मचारी फिरोज तडवी यांचं कौतुक करत त्यांना शाबासकीची थाप दिली.
