मिळालेल्या माहितीनुसार, पीडित कुटुंब आर्थिक अडचणीत असल्यामुळे त्यांनी एका सावकाराकडून कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड वेळेवर न झाल्याने सावकाराने वसुलीसाठी गुंडांना पाठवले. हे गुंड थेट पीडित कुटुंबाच्या घरात घुसले आणि त्यांनी कुटुंबातील सदस्यांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे कुटुंबाला स्वत:चा बचाव करता आला नाही. हल्ल्यात घरातील तीन सदस्य गंभीर जखमी झाले, ज्यात एका महिलेचाही समावेश आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली आणि जखमींना तात्काळ मालेगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे ही घटना सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. व्हिडिओमध्ये गुंड कुटुंबातील सदस्यांना क्रूरपणे मारहाण करताना दिसत आहेत, ज्यामुळे समाजमन सुन्न झाले आहे.
या प्रकरणी पीडित कुटुंबाने वडनेर खाकुर्डी पोलीस स्थानकात सावकारासह त्याच्या गुंडांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र, अद्यापपर्यंत आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असून यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.