विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीय तेढ निर्माण करण्याची पायाभरणी : अमोल कोल्हे
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय स्वार्थ साधण्यासाठी जातीय तेढ निर्माण करण्याची पायाभरणी सध्या केली जात असल्याचे दिसत आहे. कोणत्याही महाराजांनी बोलताना कुठल्याही धर्माविषयी अपशब्द वापरायला नको. कुठल्याही धर्मापेक्षा मानवता हा धर्म मोठा आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे. परंतु, असे वक्तव्य करणाऱ्या महाराजांसोबत मुख्यमंत्री व्यासपीठ शेअर करत असतील तर ही गंभीर बाब आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीय तेढ निर्माण करण्याची ही पायाभरणी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे.
advertisement
मुख्यमंत्र्यांकडून संत असा उल्लेख
रामगिरी महाराजांच्या हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केलं, यात त्यांनी रामगिरी महाराजांचा उल्लेख संत असा केला आहे. ‘वारकरी संप्रदायाची ताकद प्रवचनाच्या माध्यमातून गावागावात समाज प्रबोधनाचं काम करत असते. अनेक कुटुंब दु:खातून सावरल्याचं आपण पाहतो, यांना दिशा देण्याचं काम रामगिरी महाराजांसारखे संत करत असतात’, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
वाचा - रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल, काही तासांमध्ये मुख्यमंत्री पोहोचले भेटायला
अहमदनगरमध्ये मोर्चा
येवल्यामध्ये महंत रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 299 अंतर्गत रामगिरी महाराजांविरोधात येवल्यात गुन्हा दाखल झाला आहे. महंत रामगिरी महाराज यांनी महंमद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी मुस्लिम समाजानं अहमदनगर इथे पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला आणि रस्ता रोकोही करण्यात आला आहे. महंत रामगिरी महाराज यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी मुस्लिम समाजाकडून करण्यात येत आहे.