ही घटना नाशिक शहरातील गायकवाड मळा परिसरात उघडकीस आली आहे. पीडित मुलाच्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा १३ वर्षीय मुलगा आणि ८ वर्षीय मुलगी पतीकडे राहतात. पतीसोबत राहणाऱ्या या सावत्र आईकडून मुलांना वेळोवेळी मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता. मुलांना जेवण न देणे, उन्हात उभे करणे असे अमानुष प्रकार ती करत होती.
advertisement
या त्रासासोबतच, सावत्र आईने मोठ्या मुलासोबत अश्लील बोलणे, नकळतपणे त्याचे व्हीडिओ काढणे आणि घरात एकटा असताना त्याच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे मुलगा अतिशय घाबरला होता. त्याने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला.
मुलाचे म्हणणे ऐकून आईने तातडीने चाइल्ड हेल्पलाइनवर संपर्क साधला आणि ऑनलाईन तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत उपनगर पोलिसांनी तातडीने ३४ वर्षीय संशयित महिलेच्या विरोधात 'POCSO' कायद्याच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला. या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलीस करत आहेत. आई-वडील विभक्त झाल्यानंतर मुलांचे संगोपन करणाऱ्या सावत्र आईकडूनच असा प्रकार घडल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.