सौरभ संजय देशमुख आणि मोहित मिलिंद ताम्हाणे असं गुन्हा दाखल झालेल्या दोन आरोपींची नावं आहे. सौरभ देशमुख हा हॉटेलचालक असून तो निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा आहे. तर मोहित ताम्हाणे हा एक वेटर आहे. पोलिसांनी दोघांविरोधात विनयभंग, दरोडा, डांबून ठेवण्यासह विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केलं असता नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली.
advertisement
नेमकं प्रकरण काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित देशमुख याचे ‘कॅटल हाऊस’ नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये अनेकदा बेकायदेशीर कामं केली जातात. त्याच्यावर यापूर्वी पोलिसांनी छापे टाकून कायदेशीर कारवाई केली होती. पीडित फोटोग्राफर मैत्रीण आणि तिच्या मित्राची संशयित ताम्हाणेशी ओळख आहे. ताम्हाणेने २०२० पासून त्यांच्याकडून उसने पैसे घेतले होते. पण तो पैसे परत करत नव्हता. दरम्यान, ताम्हाणे संबंधित हॉटेलात असल्याचे समजल्यावर तिघेही तेथे पैसे मागण्यासाठी गेले.
'हॉटेलमध्ये येऊन मोठी चूक केली'
पण आरोपी हॉटेल चालक आणि ताम्हाणे यांनी दोन्ही तरुणींना हॉटेलमध्ये डांबलं. ‘तुम्ही येथे येऊन मोठी चूक केली, माझ्या हॉटेलमध्ये ‘कॉलगर्ल्स’ पुरविल्या जातात, तुम्ही दोघीही ते काम करा. मी पैसे देईन. मोहीतकडून पैसे मागण्याची गरज भासणार नाही’ अशी ऑफर आरोपी हॉटेलचालक देशमुखने दिली. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडित तरुणींना बंदुकीचा धाक दाखवत शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
पहाटेपर्यंत हॉटेलमध्ये....
यावेळी आरोपींनी त्यांच्याकडील २१ हजार रुपये काढून घेतले. रात्रभर हॉटेलमध्ये डांबून ठेवल्यानंतर पहाटे साडेपाचच्या सुमारास तिघांना सोडून दिले. हा प्रकार चार महिन्यांपूर्वी घडला होता. आरोपींच्या धाकाला घाबरुन पीडित तरुणींनी कुठेही तक्रार केली नव्हती. मात्र मोहीतने पुन्हा व्हॉट्सॲपवरून धमकीचे मेसेज पाठवत तरुणींना त्रास दिला. यानंतर पीडितांनी म्हसरुळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दोघांना अटक केली असून घटनेचा तपास केला जात आहे.