मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या काही दिवसांत नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन पार पडणार आहे. मात्र, उद्घाटनाआधीच या विमानतळावरील कर्मचारी भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. गुजराती भाषा येणाऱ्यांनाच या ठिकाणी नोकरी दिली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. स्थानिक भूमिपुत्रांचा हक्क डावलला जात असल्याचाही आरोप करण्यात येत आहे.
advertisement
बुधवारी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान नवी मुंबई विमानतळावर उतरणार आहे. त्यानंतर पीएम मोदी रन वे आणि टर्मिनल 1 ची पाहणी करणार असल्याची माहिती सिडकोने दिली आहे. या विमानतळावरून प्रवासी वाहतूक ही डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
नवी मुंबई विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते, माजी खासदार, माजी विरोधी पक्षनेते असलेले दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी स्थानिकांकडून सातत्याने करण्यात होती. दि. बा. पाटील यांच्या नावासाठी आंदोलनेही झाली. आता, या नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. आता, दुसरीकडे कर्मचारी नोकर भरतीवरून वाद पेटण्याची शक्यता आहे.
गुजराती येत असलेल्यांना नोकरी...
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची घोषणा झाली असली तरी कर्मचारी मात्र गुजरात असणार असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला. विमानतळ कर्मचारी भरती दरम्यान, गुजराती येते का, असा प्रश्न विचारण्यात आला असून त्यांनाच नोकरी दिली गेली असल्याचा आरोप राऊत यांनी केला. विमानतळाच्या या गुजरातीकरणाविरोधात शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोर्चा काढणार असून इतरही स्थानिक पक्ष, संघटना असणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
संजय राऊत यांनी सांगितले की, नवी मुंबई विमानतळाचं गुजरातीकरण झालं आहे. गुजराती येते का विचारून नोकरी देण्याचा प्रकार झाला आहे. स्थानिक संघटनांसह ठाकरे गट-मनसे एकत्र येत आंदोलन करणार आहे. राज ठाकरे यांना याबाबतची कल्पना दिली आहे. स्थानिकांना नोकरी डावलल्यास डिसेंबरला विमान कसं उडणार हे पाहून घेणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
काही दिवसांपूर्वी, शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार जयंत पाटील यांनी देखील स्थानिकांच्या नोकरीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. स्थानिकांना नोकरी न दिल्यास धावपट्टीवर धाव घेऊ असा इशाराही त्यांनी दिला.