नवी मुंबई : तुर्भे परिसरात जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी करण्यात आलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 23 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृताचे नाव किशोर वरक असे असून तो वाशीतील एम.जी.एम. रुग्णालयात उपचार घेत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशुतोष मोहन धुर्वे हे नोकरी करणारे असून 8 ऑक्टोबर रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आरोपी विकी पाटील, संकेत लाड उर्फ लाडू, ओंकार वाघमारे उर्फ गण्या, विघ्नेश घरत, शकील, मौला, चारुशिला (विकी पाटीलची पत्नी) आणि आणखी तीन अनोळखी इसम यांनी फिर्यादीला जुने वाद मिटवायचे आहेत,या बहाण्याने बोलावले होते. मात्र, तेथे पोहोचताच आरोपींनी अचानक फिर्यादी व त्याचे मित्र किशोर वरक आणि विकी कांबळे यांच्यावर हल्ला चढवला. क्रिकेटची लाकडी बॅट, फायबर रॉड, दगड आणि सिमेंटच्या विटांचा वापर करून आरोपींनी तिघांना बेदम मारहाण केली.
advertisement
उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू
या हल्ल्यात किशोर वरकच्या डोक्यात गंभीर जखम झाली, तर आशुतोष धुर्वेचा डावा हात फ्रॅक्चर झाला. विकी कांबळे यालाही बरगड्यांवर व हातांवर गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना तात्काळ वाशीतील एम.जी.एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान किशोर वरकचा मृत्यू झाला.
आरोपींची नावे
- विकी पाटील
- संकेत लाड उर्फ लाडु
- ओंकार वाघमारे उर्फ गण्या
- विघ्नेश घरत
- शकील
- मौला
- चारुशिला
- तसेच तीन अनोळखी इसम
गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल
किशोरच्या मृत्यूनंतर रुग्णालयाबाहेर नातेवाईक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात आठ आरोपींविरोधात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
जुन्या वादातून हल्ला झाल्याची शक्यता
पोलिसांनी आरोपींविरोधात प्राणघातक हल्ला, जखमी करण्याचा प्रयत्न, गटाने गुन्हा करणे, धमकी देणे आणि मालमत्तेचे नुकसान या गंभीर आरोपाखाली गुन्हा नोंदविला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्राथमिक चौकशीत जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, आरोपींच्या अटकेसाठी दोन स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत.