राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरमध्ये नुकत्याच झालेल्या घरकुल धनादेश वितरण कार्यक्रमात या योजनेविषयी सूचक आणि थेट टिप्पणी केली. “विकासासाठी आवश्यक असलेला निधी वेळेवर मिळत नाही, कारण तो ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी वळवला जातो,” असा आरोप करत भरणेंनी राज्यातील आर्थिक प्राधान्यक्रमावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. भरणेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
advertisement
अजित पवारांनी काय म्हटले?
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांना दत्ता भरणे यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असताना त्यांनी कोणता निधी मिळाला नाही हे विचारणार असल्याचे म्हटले. अजित पवारांनी म्हटले की, तो माझा सहकारी आहे. मंत्रिमंडळात आहे. नेमका कुठला निधी मिळाला नाही आणि कुठल्या अर्थानं ते बोलले हे त्यांना विचारून सांगतो, असं म्हटले.
दत्तात्रय भरणे काय म्हणाले होते?
इंदापूर येथील कार्यक्रमात दत्तात्रय भरणे यांनी म्हटले की, मी नेहमीच पाठपुरावा करत असतो. मी मुंबईत असू द्या, पुण्यात असू द्या किंवा कुठेही असू द्या, त्यातून माझ्या इंदापूर तालुक्याला सर्वाधिक निधी कसा मिळेल यासाठी मी प्रयत्न करत असतो. आज लाडकी बहिण योजनेमुळे निधी यायला थोडा उशीर होत आहे. लाडकी बहीण योजनेमुळे निधी मिळण्यास उशीर झाला होता. पण आज सर्व हळूहळू गाडी सुरळीत झाली असल्याचे त्यांनी म्हटले.