राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार रमेश कदम यांचं अपहरण करून खंडणी मागण्याचा प्रयत्न सुरु असल्याची ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप समोर आली. रमेश कदम यांना रिव्हॉल्वर लावून अपहरण करून पुण्यात नेण्याबाबत ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिपमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. व्हायरल होणाऱ्या या क्लिपमुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र, या ऑडिओ-व्हिडीओ क्लिपच्या सत्यतेबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आली नाही.
advertisement
मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचे अपहरण करण्यासाठी पुण्यातील आबा काशीद नामक व्यक्तीने सुपारी दिल्याचा आरोप करण्यात आला. मोहोळ येथील आकाश बाबर आणि धनराज भोसले नामक युवकांना रिव्हॉल्वर, गाडी आणि पैसे दिल्याचे उघड झाले आहे. मागील पंधरा दिवसात रमेश कदम यांच्याबाबत दुसऱ्यांदा हा प्रकार पाहायला मिळाला. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. आकाश बाबर आणि धनराज भोसले हे आरोपी मोहोळ पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर, मुख्य सूत्रधार आबासाहेब काशीद याचा शोध सुरू असून तीन पथकं त्याच्या मागावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपींवर रिव्हॉल्वर दाखवून खंडणी मागणे किंवा जीवे मारण्यासाठी अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोहोळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. भारतीय न्याय संहिता कलम 140(2), 140(3),62, 3 कलमांतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रमेश कदम यांनी सांगितले की, माझ्या जीवितास धोका असून मागील 15 दिवसात हा दुसऱ्यांदा प्रकार घडला आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे मला पोलीस सुरक्षा मिळावी अन्यथा माझा बाबा सिद्दीकी व्हायला वेळ लागणार नाही अशी प्रतिक्रिया दिली.
