अनमोल केवटे (रा. मंद्रूप, जि. सोलापूर) असं हल्ल्यात मरण पावलेल्या तरुणाचं नाव आहे. तर या हल्ल्याच्या वेळी त्यांच्यासोबत असलेली महिला सहकारी सोनाली भोसले गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून, मुख्य आरोपीसह दोघे फरार आहेत.
मध्यरात्री नक्की काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, अनमोल केवटे आणि सोनाली भोसले हे लातूर येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या मेळाव्यासाठी आले होते. मेळाव्यानंतर ते आपल्या कारमधून सोलापूरकडे परतत होते. रात्री पावणे एकच्या सुमारास लातूरजवळील खाडगाव रोडवर त्यांची कार आणि आरोपींची जीप यांच्यात ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला.
advertisement
हा वाद विकोपाला गेला असता, आरोपींनी आपली जीप कारसमोर आडवी लावून त्यांना थांबवले. त्यानंतर आरोपींनी अनमोलवर धारदार चाकूने हल्ला केला. गळ्यावर, मानेवर आणि पोटात अनेक वार केल्याने अनमोलचा जागीच मृत्यू झाला. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या सोनाली भोसले यांच्यावरही आरोपींनी हल्ला केला. त्यांच्या छातीत आणि पाठीवर वार झाल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
दोन हल्लेखोरांना अटक
या हल्ल्यात विष्णू मामडगे, मंथन मामडगे, शुभम पतंगे आणि वैभव स्वामी यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. शुभम पतंगे आणि वैभव स्वामी यांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, मुख्य आरोपी विष्णू मामडगे आणि त्याचा चुलत भाऊ मंथन मामडगे फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी लातूर पोलिसांनी पाच पथके रवाना केली आहेत.
शरद पवार गटाचा कार्यकर्ता असल्याचं सांगायचा
मृत अनमोल केवटे हा मूळचा सोलापूरचा असून, तो राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कार्यकर्ता असल्याचे सांगत असे. त्याच्यावर यापूर्वीही खंडणी आणि मारामारीसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला सोलापूर जिल्ह्यातून तडीपारही करण्यात आले होते. या घटनेमुळे लातूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.