अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. “जरांगेंचा लढा हा आरक्षणासाठी नसून सरकार अस्थिर करण्याचा राजकीय अजेंडा आहे,” असा गंभीर आरोप हाके यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केला. उपोषण आंदोलनासाठी मुंबईत निघण्याआधीच त्यांनी स्क्रिप्ट फोडली. सरकार उलथवून टाकण्याचा त्यांचा डाव असून उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आमदार सामील असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
advertisement
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटले की, या महाराष्ट्रात धुंडशाही जोमात आणि लोकशाही कोमात आहे. झुंडशाहीच्या जोरावर महाराष्ट्रातील ओबीसी रचना संपवण्याचा घाट घातला जात आहे. जरांगे नावाच्या काडेपेटीचा ज्वालामुखी केला. हे काम सर्वपक्षीय आमदार खासदारांनी केले. जरांगे नावाच्या काडेपेटीला ओबीसीतून आरक्षण का पाहिजे असा सवाल हाके यांनी केला. जरांगे हुकूमशाहा आहेत का? ते न्यायालयाला मानायला तयार नाहीत असा प्रश्न उपस्थित केला.
लक्ष्मण हाके यांनी म्हटले की, हा आरक्षणाचा लढा नाही. जरांगेनी मुंबईकडे निघताना स्क्रिप्ट फोडली. मी सरकार उलथून लावणार असल्याची भाषा मनोज जरांगे यांनी केली. सरकार उलथवण्यासाठी जरांगेसह अजित पवारांचे आमदार खासदार सामिल आहेत. अजितदादांच्या आमदारांकडून जरांगे यांच्या आंदोलनाला रसद पुरवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. बीड ज्या पद्धतीने पेटलं, ती परिस्थिती मुंबईमध्ये होऊ शकते, असा इशारा त्यांनी केला.
50 टक्के एकत्र आले तर काय होईल....
लक्ष्मण हाके यांनी म्हटले की, झुंडीच्या जोरावर दबाव निर्माण केला जात आहे. काही पाच एक टक्के लोक गर्दी करून सरकारवर दबाव आणत आहेत. आम्ही ओबीसी हे गावगड्यात 50 टक्के आहोत. आम्ही सगळे एकत्र झालो तर तुमचं काय होईल असा सवाल जरांगेंना केला. हे सगळे जण ओबीसी आरक्षण संपवायला चालले असल्याचे त्यांनी म्हटले.