संरक्षणासाठी हलवली होती मूर्ती
सध्या मंदिरात असलेली विठ्ठलाची मूर्ती ही सुमारे सव्वातीनशे आक्रमकांच्या तडाख्यात सापडू नये, म्हणून संत प्रल्हाद महाराज बडवे आणि देगावचे पाटील सूर्याजीराव घाडगे यांनी प्रयत्न केले. मंदिरांची मोडतोड करत आलेल्या अफजल खानाच्या स्वारीच्या वेळी विठ्ठलाची मूर्ती वाचवण्यासाठी 1665 साली आणि 2 ऑक्टोबर 1695 ते 13 ऑक्टोबर 1699 दरम्यान औरंगजेबाच्या स्वारीच्या वेळी विठ्ठल मंदिरातून मूर्ती हलवण्यात आली.
advertisement
पंढरपूरजवळील देगाव येथील सूर्याजीराव घाडगे पाटील यांच्या शेतातील विहीरीत ही मूर्ती लपवण्यात आली होती. पाणी उपसले तर मूर्ती दिसेल, म्हणून घाडगे पाटील यांनी विहिरीतील पाणी शेतीला न देता मूर्ती जतन केली. सुमारे 6 वर्ष देवाचे नित्योपचार सुरू ठेवले. ही मूर्ती काही दिवस गवताच्या गंजीत लपवून ठेवण्यात आली. तसंच सूर्याजी घाडगे यांनी आपल्या वाड्याच्या तळघरातही काही महिने विठ्ठल मूर्ती लपवली.
संकट टळल्यावर विठ्ठल मूर्ती पुन्हा पंढरपूरच्या मंदिरात आणली गेली. या घटनेच्या स्मरणार्थ अजूनही श्रावण शुद्ध पंचमीला देगाव येथे वारकरी संप्रदाय, बडवे समाज आणि पाटील कुटुंबाकडून मूर्ती संवर्धन दिन पाळण्यात येतो. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होतात. पंढरपूरनजिकच्या चिंचोली, गुळसरे आदी गावांमध्येही पंढरपुरातील विठ्ठलाची मूर्ती हलवल्याचे दाखले मिळतात.
मूर्तीविषयक वादविवाद
मधल्या काळात सध्याची मूर्ती ही मूळ मूर्ती नाही. मूळची मूर्ती अन्यत्र हलविली गेली आहे, असे दावे करण्यात आले होते. पौराणिक ग्रंथांमध्ये सांगितलेली मूर्तीच्या अंगावरील लक्षणे ही माढा येथील श्रीविठ्ठलाच्या मूर्तीवर आढळतात. त्यामुळे आक्रमकांपासून पंढरपुरातून माढ्याला हलवलेली विठ्ठलाची मूर्ती पुन्हा आणली गेली नाही, अशी शक्यता ज्येष्ठ संशोधक रा. चिं. ढेरे यांनी व्यक्त केली होती. ‘श्रीविठ्ठल : एक महासमन्वय’ या आपल्या ग्रंथातून त्यांनी आपले विठ्ठलमूर्तीबाबतचे संशोधन मांडले आहे.
पंढरपुरातील सध्याची मूर्ती ही विठ्ठलाची मूळ मूर्ती आहे, असे सांगत महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी ढेरे यांचा दावा खोडला. तर इतिहास संशोधक ग. ह. खरे आणि मूर्तीशास्त्राचे अभ्यासक गो. ब. देगलूरकर यांनीही सध्याची मूर्तीच मूळ मूर्ती असल्याचा निर्वाळा दिला आहे. आता मंदिरात भुयार सापडल्यानंतर पंढरपुरात पुन्हा या चर्चा सुरू झाल्या आहेत.
(माहिती साभार - ज्ञानबातुकाराम.डॉट.कॉम)